नाशिक : जिल्ह्यातील आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना तिसरा अर्थात प्रिकॉशन डोस देण्यास १० जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. मात्र, त्यातील अटीनुसार ज्यांचा दुसरा डोस घेऊन झालेला आहे, त्यांनाच हा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी मिळून १ लाख ९३ हजार ७३० पहिला डोस घेतल्याची नोंद आहे, तर दुसरा डोस हा १ लाख ७४ हजार ६२६ जणांनीच घेतल्याची नोंद आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एकतर १९ हजार १०४ आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसच घेतलेला नाही किंवा १९ हजारांहून अधिक सामान्य नागरिक किंवा संबंधितांच्या कुटुंबीयांनी पहिला डोस लवकर मिळण्यासाठी आरोग्य अथवा फ्रंटलाईन कर्मचारी असल्याचे दर्शवून पहिला डोस लवकर मिळवल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात सोमवारपासून (दि. १०) हेल्थ वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सना प्रिकॉशन डोस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखविण्याची आवश्यकता नसली तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये किमान ९ महिन्यांचे अंतर बंधनकारक आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत दोन डोस झालेले ४५ हेल्थ वर्कर्स या प्रक्रियेसाठी पात्र असून त्यांना प्रिकॉशन डोस देण्यास प्रारंभदेखील झाला असून, त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या अभियानात हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या दुसऱ्या डोसला केवळ ९ महिने पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे. त्यामुळे दिवसागणिक पात्र संख्येत भर पडत जाणार आहे. मात्र मुळात पहिल्या आणि दुसऱ्या डोस घेतलेल्यांच्या संख्येतच १९ हजारांहून अधिक तफावत असल्याचे दिसून येत आहे.
तफावतीमागील कारणे संशयास्पद
जिल्ह्यात १९ हजार १०४ आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सनीच खरोखर दुसरा डोस घेतलेला नाही की त्यांच्या नावाने कुणी अन्यच पहिला डोस घेतला? अशी चर्चा सुरु आहे. दुसऱ्या डोस सर्वांना उपलब्ध झाल्यानंतर ज्यांनी पहिला डोस आरोग्य किंवा फ्रंटलाईन कर्मचारी असे दर्शवून घेतला, त्यांनी दुसरा डोस सामान्य नागरिक म्हणून घेतल्यानेच इतकी मोठी तफावत दिसत असल्याचीही शक्यता आहे. जर खरोखर दुसरा डोस न घेतलेले इतके आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्स असतील, तर त्यांना दुसरा डोस घ्यायला प्रवृत्त करण्याचे काम संबंधित शासकीय विभागप्रमुखांना करावे लागणार आहे.