नाशिक : महापालिकेतील रिक्त झालेली पदे आणि वाढत्या लोकसंख्येला तसेच विकासकामांसाठी लागणारी पदे याचा विचार केला तर सद्यस्थितीत दोन हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने यापूर्वी रिक्त पदांच्या आराखड्याला दिलेल्या मंजुरीचा विचार करता १२०० पदे रिक्त आहेत आणि नव्या पदांचा त्यात समावेश झाल्यास ही संख्या दोन हजारांहून अधिक असणार आहे.महापालिकेच्या वतीने चार वर्षांपूर्वी म्हणजेच भास्कर सानप आयुक्त असताना रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी घेण्यात आली होती. त्यावेळी फक्त एक हजार पदे होती; परंतु दरम्यानच्या काळात अनेक अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्याने ही संख्या वाढत गेली असून, आजमितीला मंजूर असलेल्या एकूण सात हजार ४९ पदांपैकी १२०० पदे रिक्त ठरली आहेत. आता पालिकेच्या वतीने नवीन आकृतिबंध तयार करण्याचे काम सुरू असून, त्यात ही संख्या वाढणार आहे. पालिकेच्या सेवेत घेण्यासाठी जुने नियम आणि उपनियम बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. पूर्वी दहावी-बारावी पास उत्तीर्ण उमेदवार ज्या पदांकरिता पात्र ठरत असतील त्या पदांकरिता ही मर्यादा आता पदवीपर्यंत केली जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक पदाकरिता अशा पात्रता निश्चित केल्या जाणार आहेत. लिपिक पदासाठी पदवी आणि त्यावर एलएसजीडीसारख्या नव्या पात्रता टाकल्या जातील. तसेच काही पदांसाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभवदेखील महत्त्वाचा ठरणार आहे.गेल्या पाच वर्षांत पालिकेत पदोन्नतीचा घोळ प्रचंड गाजला. पालिकेतील सर्व रिक्त पदे पदोन्नतीनेच भरावी असा महासभेचा ठराव आहे, तर दुसरीकडे सर्वच पदे अशा पद्धतीने न भरता ५० टक्के पदे पदोन्नतीने आणि ५० टक्के सरळ भरतीने भरण्याची प्रशासनाची भूमिका आहे. तथापि, नव्या नियमावलीत आता याबाबत धोरण स्पष्टपणे ठरणार आहे. महापालिकेने सदरची नियमावली आणि आकृतिबंध मंजुरीचे काम सुरू केले असून, ते पूर्ण झाल्यानंतर महासभेत सादर केले जाणार आहे. महासभा त्यात सुधारणा करू शकेल आणि मग हे नियम आणि आकृतिबंध राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. सदरची नियमावली तयार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुणे, पिंप्री-चिंचवड अशा विविध महापालिकेच्या सेवा नियमांचाही अभ्यास केला जात आहे. (प्रतिनिधी)
पालिकेत अडीच हजारांहून अधिक पदे रिक्त
By admin | Published: October 29, 2014 11:56 PM