नाशिक : एलबीटीचा भरणा न करणे आणि मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या आणखी ४०० व्यापाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांची बॅँक खाती सील केली आहेत. यापुढे ही कारवाई अधिक व्यापक करण्यात येणार असून, अखेरचा पर्याय जप्ती अथवा झडतीसत्र हाच असेल, अशी माहिती कर विभागाचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.एलबीटी थकविणाऱ्या आणि विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. महापालिकेने यापूर्वी १८० व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील केली होती. आता गुरुवारी महापालिकेने शहरातील आणखी ४०० व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मनपाने एलबीटीचा भरणा करण्याबाबत वारंवार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या; परंतु तरीही भरणा होत नसल्याने पालिकेने व्यापाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर व्यापाऱ्यांना पुढील तीन महिने मार्च ते जून या कालावधीत विवरणपत्र सादर करण्याची मुदत दिली जाते. सदर मुदत संपल्यानंतर दाखल विवरणपत्रांची छाननी केली जाते आणि ज्यांनी विवरणपत्र दाखल केले नसतील त्यांना नोटिसा बजावण्यात येतात. चालू आर्थिक वर्षात अशा १६ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसांनंतर पुन्हा १५ दिवसांची मुदत दिली जाते. त्यातही व्यापाऱ्यांनी विवरणपत्र दाखल न केल्यास पुन्हा नोटिसा बजावून पाच हजार रुपये दंड कायम केला जातो. त्यासाठी पुन्हा १५ दिवसांची मुदत दिली जाते. पुन्हा एकदा छाननी होऊन प्रत्येकाला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतरही भरणा व विवरणपत्र दाखल न केल्यास बॅँक खाती सील करण्याची कार्यवाही होत असल्याचे फडोळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आणखी ४०० व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला
By admin | Published: December 05, 2014 1:30 AM