सिडको : नाशिक महापालिकेच्या नगररचना (टाउन प्लॅनिंग) विभागाच्या गलथान कारभारमुळे नागरिकांना फ्लॅट विकत घेण्याच्या आधीपासूनच भरमसाठ घरपट्टी भरण्याच्या नोटिसा बजावल्या असल्याने सिडकोवासीयांमध्ये मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाढीव घरपट्टीच्या मनपाने बजाविलेल्या नोटिसांबाबत आक्षेप घेत सदरची घणपट्टी नियमानुसार द्यावी यासाठी चार हजारांहून अधिक मिळकतधारकांनी मनपाकडे हरकती घेतल्या असून, हा ओघ सुरूच असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे मनपाच्या घरपट्टी विभागाकडून मात्र मिळकतधारकांना वाढीव घरपट्टीसाठी बजाविण्याचे काम सुरूच असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.मनपाच्या वतीने सुरुवातीस फ्लॅट असलेल्या मिळकतधारकांना नोटीस बजाविल्या असून, यातील बहुतांशी सर्वच मिळकतधारकांना घराच्या मोजमापापेक्षा अधिक घरपट्टी लावली आहे. मनपाच्या नजररचना विभागाने त्याच्याकडे नोंद असतानाही त्याबाबतचा तपशील हा घरपट्टी विभागाकडे दिल्या नाही. नगररचना विभागाच्याच गलथान कारभारामुळे मिळकतधारकांना टू बीएचके फ्लॅट असताना त्यांना थ्री बीएचके फ्लॅटची आकारणी करण्यात आली असल्याच्या हरकती मनपाकडे दाखल करण्यात आल्या आहेत. महापालिकेने खासगी कंपनीच्या माध्यमातून घरपट्टीची आकारणी केली असून, ज्यांनी ही आकारणी केली आहे त्यांना याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी चुकीची आकारणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला सिडकोसह बडदेनगर, अभियंतानगर, कामटवाडे व परिसरातील फ्लॅटधारकांना घरपट्टी भरण्याच्या नोटिसा दिल्या असून, या नोटिसा देताना मनपाने मिळकतधारकांना भरमसाठ घरपट्टी लावली आहे. यात ज्या नागरिकांचा फ्लॅट २ बीएचके आहे, त्यांना ३ बीएचके फ्लॅटची आकारणी केली आहे. यामुळे बहुतांशी मिळकतधारकांना सुमारे ८० हजारांहून अधिक घरपट्टी लावल्याने मनपाच्या या अजब कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या प्रभागसभेतही नगरसेवकांनी लक्षवेधी सूचना मांडल्या असून, याबाबत मनपाने लवकरात लवकर निर्णय घेऊन वाढीव घरपट्टीच्या नोटिसांबाबत विचार करून त्या पूर्ववत करण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले.चुकीच्या पद्धतीने आकारणीमनपाच्या नगररचना विभागात मिळकतधारक केव्हापासून राहण्यास आला आहे. त्याबाबतीत नोंद असते. परंतु नगररचना विभागाने याकडे लक्ष न दिल्याने घरपट्टी विभागाने चुकीच्या पद्धतीने नागरिकांना घरपट्टी आकारणी केली आहे. नगररचना विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, सिडकोवासीयांची घरपट्टीबाबत सकारात्मक विचार न केल्यास नागरिकांना बरोबर घेत जनआंदोलन उभारणार असल्याचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
सिडको विभागात चार हजारांहून अधिक हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:21 AM
नाशिक महापालिकेच्या नगररचना (टाउन प्लॅनिंग) विभागाच्या गलथान कारभारमुळे नागरिकांना फ्लॅट विकत घेण्याच्या आधीपासूनच भरमसाठ घरपट्टी भरण्याच्या नोटिसा बजावल्या असल्याने सिडकोवासीयांमध्ये मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : मनपाच्या नगररचना विभागाचा गलथान कारभार