सिडको : कोरोनाच्या नव्या नियमावलीत रेस्टॉरंट चालकांची घोर निराशा झाल्याने महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने गोविंद नगरच्या दि नाशिक रेस्टॉरंट क्लस्टर येथे आंदोलन करण्यात आले. त्यात नाशिकमधील सुमारे ५०पेक्षा अधिक रेस्टॉरंट व्यावसायिकांनी प्रत्यक्षपणे सहभाग नोंदवला. तर २०० पेक्षा अधिक रेस्टॉरंट चालक-मालकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता.
जवळपास सर्वच व्यावसायिकांना रात्री ८ वाजेपर्यंत वेळ वाढवून मिळाली असताना रेस्टॉरंट व्यवसायास यातून वगळल्याने नव्या लोकडाऊन नियमावलीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नाशिकमधील रेस्टॉरंट व्यावसायिकांनी संघटित होऊन याबाबतीत निदर्शने करून आपली नाराजी व्यक्त केली. मुळात रेस्टॉरंटमध्ये बसून खाण्यासाठी सायंकाळी नागरिक बाहेर पडतात. अशात दुपारी चारनंतर आसन व्यवस्थेवर निर्बंध लादल्याने नागरिकांचीदेखील मोठी गैरसोय होते, शिवाय रेस्टॉरंटला मोठ्या आर्थिक अडचणींचा फटकादेखील बसत आहे. मागील लॉकडाऊन असो अथवा आत्ताची गेली ४ महिने रेस्टॉरंट मालकांनी शासनाचे नियम पाळत आपल्या व्यवसायाची गाडी सुरू ठेवली होती, परंतु नव्या नियमावलीत झालेला दुजाभाव सहन न करण्याचा पवित्रा नाशिकमधील रेस्टॉरंटवाल्यांनी स्वीकारला आहे. रेस्टॉरंटला रात्री १० वाजेपर्यंतची वेळ वाढवून मिळावी या प्रमुख मागणीसह आर्थिक पॅकेजसाठीही सर्वच व्यावसायिक आग्रही आहेत. महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लबच्या वतीने आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हा अधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब नाशिक शहर अध्यक्ष वेदांशू पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० ते १२ हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिकांनी सकाळी महाराष्ट्र शासनाने रेस्टॉरंट व्यवसाय रात्री दहा वाजेपर्यंतची वेळ वाढवून देण्याबाबत निषेध आंदोलन करून सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, त्या आंदोलनाची कोणतीही पूर्वकल्पना न देता व कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने सदर आंदोलनकर्ते यांच्यावर अंबड पोलीस स्टेशनमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोट..
येत्या १० तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही सर्व नियम झुगारून रात्री १० पर्यंत आसन व्यवस्थेसह रेस्टॉरंट चालवू आणि दरम्यानच्या काळात कुठलीही कारवाई अथवा दंड आकारण्यात आल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.
- वेदांशू पाटील, संस्थापक, महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब