नाशिक : राज्यातील नॉनमेट्रो शहरांमध्ये नाशिक झपाट्याने विकसित होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या विविध प्रकल्पांमध्ये सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे एका मालमत्ता सल्लागार संस्थेने स्थानिक बांधकाम व्यावसायिक संघटना व खासगी अर्थसहाय संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘नाशिक अमर्याद संधींची भूमी’ या संशोधन अहवालातून समोर आले आहे.नाशिकमध्ये शहराचे वातावरण आणि विकासाला असलेला वाव यामुळे गुंतवणूकदारांची नाशिकला मोठ्या प्रमाणात पसंती असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, संमिश्र जमिनीचा वापर व साचेबद्धपणासोबतच सांडपाणी, कचरा व्यवस्थापन याबाबीत नाशिक शहराने अहमदाबाद, भुवनेश्वर, कोईम्बतूर, हैदराबाद, नागपूरसह अगदी ठाणे आणि नवी मुंबईसारख्या शहरांनाही मागे टाकले आहे.स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या नाशिकमध्ये प्रदूषणाचे प्रमाण कमी असून, नाशिक हे प्रमुख एज्युकेशनल हब व आयटी-आयटीई स्टार्ट-अप हब बनले असल्याचे नमूद करतानाच नाशिकच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कुंभनगरीसह वाइनसिटी म्हणून असलेली ओळख या गुणवैशिष्ट्यांवर या अहवालात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. क्रेडाई नाशिकसह अॅनारॉक या संस्थेने हा अहवाल एका खासगी अर्थसाहाय्य संस्थेच्या सहकार्याने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.नाशिक शहरात नव्यानेच सुरू झालेल्या विमानसेवेचा आगामी काळात आणखी विस्तार होण्याचे संकेत आहे. तसेच मुंबई-पुण्यासारख्या शहरांना जोडणारे उत्कृष्ट रस्ते यासोबतच नाशिकमध्ये ९०४ नवीन आणि सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी ७२६ प्रकल्प महारेरा नोंदणीकृत आहेत. यातील व्यावसायिक इमारतींचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळेच शहरात २५ पेक्षा जास्त स्टार्टअपसह सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी शहरावर लक्ष केंद्रित केले असल्याचा निष्कर्ष ‘नाशिक अमर्याद संधींची भूमी’ या अहवालातून काढण्यात आला आहे.
सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे नाशिककडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:30 AM
राज्यातील नॉनमेट्रो शहरांमध्ये नाशिक झपाट्याने विकसित होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या विविध प्रकल्पांमध्ये सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे एका मालमत्ता सल्लागार संस्थेने स्थानिक बांधकाम व्यावसायिक संघटना व खासगी अर्थसहाय संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘नाशिक अमर्याद संधींची भूमी’ या संशोधन अहवालातून समोर आले आहे.
ठळक मुद्देसंशोधन अहवाल : क्रेडाईसह मालमत्ता सल्लागार संस्थेने केले सर्वेक्षण