नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (दि. ६) एकूण २६९ रुग्णांची वाढ झाली असून, ३६४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात २ आणि नाशिक शहरात १ याप्रमाणे एकूण ३ बळींमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या १,८२९ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार १८८ वर पोहोचली असून, त्यातील ९८ हजार १६४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. ३,१९५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.१३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.०१, नाशिक ग्रामीण ९३.५८, मालेगाव शहरात ९२.८२, तर जिल्हाबाह्य ९२.०२ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,१९५ बाधित रुग्णांमध्ये १,७९२ रुग्ण नाशिक शहरात, १,२३१ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १४४ रुग्ण मालेगावमध्ये, तर २८ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ९० हजार ९३९ असून, त्यातील दोन लाख ८६ हजार ९६६ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ३ हजार १८८ रुग्ण बाधित आढळून आले असून, ७८५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.