नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य मार्गाने काम करत असून, निवडणूक आयोगाचा निकालही त्यांच्याच बाजूने लागला आहे. यामुळे मी शिंदे यांच्या गटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून, येथे येताना मी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवलेली नाही. कार्यकर्त्यांवर कोणतेही दडपण नसल्याने इकडे अगदीच प्रसन्न वातावरण असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच नाशिक येथे आलेल्या शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. आपणही मंत्री व्हावे, असे मला पूर्वी वाटत होते; पण मला मिळालेले उपसभापतिपदही तितकेच महत्त्वाचे असून, त्या माध्यमातूनही मल चांगली काम करता येत असतात. यामुळे मला आता कोणत्याही पदाची अपेक्षा नाही.
ठाकरे गटापेक्षा या गटातील कार्यर्त्यांमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण असून, कार्यकर्ते टेन्शन फ्री असल्यासारखे दिसत आहेत. त्यांच्यावर कुणाचाही दबाव नसल्याची जाणीव येथे आल्यावर झाल्याचे त्यांनी ठाकरे आणि शिंदे गटातील फरकाबाबत बोलताना सांगितले. राम मंदिर, समान नागरी कायदा याशिवाय विकासाची वेगवेगळी कामे सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत आहेत. आजपर्यंत महिलांना शिवसेनेत विविध पदे मिळाली असली तरी शिवसेना नेतापद मिळालेले नव्हते. मुख्यमंत्री शिंदे यांनी माझी लगेचच शिवसेनेच्या नेतेपदी निवड केली असून, या माध्यमातून महिला सुरक्षेविषयीची अनेक कामे मला आता करता येतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर याआधीही मी काम केले आहे. त्यांच्या कामाचा धडाका पाहता सर्वसामान्य जनतेला त्याचा चांगला फायदा होईल. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही माझा चांगला संवास आहे, असेही त्यांनी सांगितले. समान नागरी कायद्याबाबत शिवसेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका जाहीर करायला हवी होती; पण ती त्यांनी केली नाही. असे त्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला.