नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी (दि. १५) एकूण १८५१ रुग्णांची वाढ झाली, तर त्या तुलनेत दीडपटीहून अधिक ३१८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तसेच एकूण ३० नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४०७० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ८८२, तर नाशिक ग्रामीणला ९११ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ५८ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला १९, असा एकूण ३० जणांचा बळी गेला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास होती. त्यात गत तीन दिवस काहीशी घट होत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळू शकणार आहे.
इन्फो
५० दिवसांनंतर उपचारार्थी २० हजारांहून कमी
गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सातत्याने अधिक राहू लागल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत सातत्याने घट येत आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या तब्बल ५० दिवसांनंतर २० हजारांहून कमी आली आहे. एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या १९१२६ वर आली असून, अशाच वेगाने बाधित कमी झाल्यास ती महिनाअखेरपर्यंत दहा हजारपेक्षाही कमी होऊ शकणार आहे.
इन्फो
प्रलंबितच्या प्रमाणातही घट
कोरोनाबाधितांच्या संख्येत कमी येण्यासह प्रलंबित अहवालांच्या संख्येतही सातत्याने घट येत आहे. शनिवारी प्रलंबित अहवालांची संख्या ३८१४ वर आली आहे. त्यातदेखील २२०६ अहवाल ग्रामीणला, १३३९ नाशिक शहरात, तर २६९ अहवाल मालेगाव मनपाचे प्रलंबित आहेत.