नाशिक : पूर्ववैमनस्यातून पाच संशयित आरोपींच्या टोळीने तीन वर्षांपूर्वी केलेल्या निखिल मोरे याच्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पाचही आरोपींना दोषी ठरवून मंगळवारी (दि.१०) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच सबळ पुराव्यांअभावी तीघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील दिंडोरीरोडवरील व्यंकटेशकृपा अपार्टमेंटसमोरील कॉलनी रस्त्यावर १७ ऑगस्ट २०१७ साली आरोपी आरीफ शहजाद कुरेशी, जॉन काजळे, शरद पगारे, रोशन पगारे, अमर गांगुर्डे यांनी हातात चॉपर, कोयते, बंदूक घेऊन निखिल मनोहर मोरे, सुरज खोडे, अमोल निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात मोरे याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. बोधनकर यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी वीस साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. सचिन गोरवाडकर यांनी युक्तिवाद केला. या पाचही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेसह प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे मोरे खून खटल्यात या टोळीवर गुन्हा सिद्ध झाला. या गुन्ह्यातून संशयित सागर चंद्रमोरे, अंकुश जाधव, सुजित पगारे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.