नाशिक : राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला असला तरी उत्तर महाराष्ट्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील टँकर्स अजूनही सुरूच आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात असल्याने जिल्ह्यातही वेळेत पावसाला सुरुवात होईल, असे आशादायक चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते; परंतु जूनच्या पंधरवड्यानंतर पावसाचा लहरीपणा चिंतेत टाकणारा ठरत आहे. जुलै महिना सुरू होऊनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यात टँकर्सची संख्या अधिक आहे.
सद्य:स्थितीत उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३४ टँकर्स सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात सुरू असलेले तीन टँकर्स येत्या दोन दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे. नंदुरबार आणि जळगावदेखील टँकरमुक्त होण्याची शक्यता आहे. मात्र, नगर, तसेच नाशिक जिल्ह्यातील टँकर्स पुढील आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. नगरमध्ये २६, तर जळगावमध्ये ११ टँकर्स सध्या सुरू आहेत.