नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी (दि.१७) एकूण १५५ रुग्णांची भर पडली असून, त्या तुलनेत दुपटीहून अधिक तब्बल ३८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत; मात्र नाशिक ग्रामीणचे ६ तर नाशिक मनपा क्षेत्रातील २ असा ८ जणांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या १८९४ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६ हजार ३१५ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १ हजार ३०७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. ३,११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.२९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.७२, नाशिक ग्रामीण ९४.६४, मालेगाव शहरात ९३.१९, तर जिल्हाबाह्य ९४.७१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,११४ बाधित रुग्णांमध्ये २०४५ रुग्ण नाशिक शहरात, ९३१ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १३२ रुग्ण मालेगावमध्ये, तर ६ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ८ हजार २६१ असून, त्यातील ३ लाख ८६१ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ६ हजार ३१५ रुग्ण बाधित आढळून आले असून, १०८५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.