नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला चाप लावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग व कंटेन्मेंट झोनची निर्मिती, अशा त्रिसूत्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला असून, एकूण रुग्णसंख्येचा विचार करता जवळपास अडीच लाखांहून अधिक लोक कंटेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच प्रतिबंधात्मक ठिकाणी असल्याने या सर्वांची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. नाशिक ग्रामीण भागात सुमारे १४ हजार ९०२ इतके कोरोनाबाधित रुग्ण असून, आजवर सुमारे बाराशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांवर विविध रुग्णांलयांमध्ये उपचार केला जात असला तरी, बाधित रुग्णांच्या संपर्कात येऊनच कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्याने ही साखळी तोडण्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी एका बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या किमान पाच व्यक्तींची अँटिजन चाचणी करून त्याआधारे त्यांची वाढ रोखण्यात येत आहे. एवढेच नव्हे, तर एाखद्या विभागात एकापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास तो भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणजेच कंटेन्मेंट झोन जाहीर केला जात असून, जिल्ह्यात सुमारे १०,८१७ झोन असून, त्यातील ३,०३१ झोनवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रुग्ण सापडलेल्या भागातील गल्ली, बोळ संपूर्ण बॅरेकेडिंगने पॅक करून या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या बाहेर जाण्या-येण्यावर निर्बंध लादण्यात येत आहेत, तर इमारतीत रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधात्मक घोषित केली जात आहे. या प्रतिबंधात्मक झोनमध्ये सुमारे अडीच लाखांहून अधिक लोक असून, घरोघरी जाऊन या सर्वांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी सुमारे एक हजार वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने कोरोना संशयित लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची अँटिजन तपासणी केली जात असून, त्यात तो बाधित आढळल्यास तात्काळ नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.
चौकट=====
समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एकट्या आरोग्य विभागावर जबाबदारी न सोपविता त्यांच्या मदतीला शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांची नेमणूक केली जात असून, त्याचबरोबर तालुका पातळीवर तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यात समन्वय ठेवण्यात येत आहे, तसेच जिल्हास्तरावरील प्रत्येक खातेप्रमुखावर एकेका तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने एकमेकांशी समन्वय व संपर्कातून कोरोनावर मात करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.