नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या अखेर जिल्ह्यात एक लाख ८५ हजार ९३६ नवीन मतदारांनी नोंदणी केली असून, त्यामुळे आता जानेवारीत प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत ४२ लाखांहून अधिक मतदारांची नावे प्रसिद्ध होणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्यात आली. प्रारंभी १४ आॅक्टोबरपर्यंत या मोहिमेची मुदत होती, नंतर मात्र तिला एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली. या मोहिमेत नवीन मतदारांची नोंदणी करण्याबरोबरच नाव, पत्त्यात दुरुस्ती, बदल, दुबार व मयत मतदारांची नाव वगळणीची संधी देण्यात आली होती. या मोहिमेत मतदार म्हणून नाव नोंदविणाऱ्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदानाची संधी मिळणार असल्याने इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्षांनी अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी प्रयत्न केले तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेनेही विशेष मोहीम राबवून मतदारांना प्रोत्साहित केले. २१ आॅक्टोबर रोजी ही मोहीम संपुष्टात आल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेकडे विधानसभा मतदार संघनिहाय अर्जांची आकडेवारी प्राप्त झाली असून, त्यानुसार जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात एक लाख ८५ हजार ९३६ इतक्या नवीन मतदारांची नोंद झाली आहे. त्यात एक लाख ६०२० पुरुष तर ७९,७२९ महिलांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पावणेदोन लाखाहून अधिक नवीन मतदार
By admin | Published: October 28, 2016 1:27 AM