सिडको : पहाटेच्या गारव्याबरोबरच आकाशकंदिलांची रोषणाई, सर्वत्र आनंद उल्हासाने भरलेल्या प्रसन्न वातावरणात उठी श्रीरामा.., ओंकारप्रधान.. या भाव व भक्ती गीतांनी सुरू झालेली दीपावली स्वरांची पहाट सुरमयी झाली. हळूहळू सूर्यकिरणांबरोबर खुलत गेलेल्या या मैफलीत रंग भरत गेला.सिडकोतील पाटीलनगर येथील साई मोरया मित्रमंडळ व बालाजी म्युझिकल इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले होते.दीपावलीतील या सुरमयी पाडवा पहाटेचा समारोप ‘सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना हैं’ या द्वंद्वगीताने झाला. दरम्यान, शुभारंभाप्रसंगी मंडळाचे सुदाम पाटील यांच्या हस्ते साईबाबा व लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. याप्रसंगी बाजीराव ठाकरे, नारायण सोनार, नाना बैरागी, भिकन चव्हाण, अतुल पाटील, नंदू पवार, कोतकर, आबा कोठावदे, नवल माळे, बॉबी परमार उपस्थित होते.माझी रेणुका माउली, विठू माउली तू, दीपावली मनायी सुहानी, अच्युतं केशवं आदी सुरमयी भाव व भक्तिगीतांनी मैफलीत रंग भरत गेले. गायक वीरेंद्रसिंग परदेशी, अजित जाधव, चंचल चौधरी, अस्लम शेख, प्रमोद कदम, अभिजित व्यवहारे, बलरामसिंग राजपूत, रफिक शेख व गायिका रोहिणी पांडे यांनी सादर करून रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
पहाटेच्या गारव्यात ‘उठी श्रीरामा’चे स्वर गुंजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:32 AM