एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर चार नातेवार्ईक, सगेसोयरे जमतात. मृतदेहावर समाज रुढीपरंपरेने अंत्यसंस्कार केले जातात. पण कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर असे कोणतेही सोपस्कार केले जात नाहीत. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून थेट स्मशानात पाठविला जातो. मृतदेह पूर्णपणे पॅक करण्याचे काम रुग्णालयातील कर्मचारीच करतात तेथे नातेवाईकांनाही प्रवेश नसतो. याशिवाय मृत्यूनंतर मृतदेह घरी घेऊन जाण्याचीही सोय नसल्याने अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य खरेदी केले जात नाही. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे पण त्या तुलनेत अंत्यसंस्काराच्या साहित्याची विक्री वाढलेली नाही. केवळ नैसर्गिकरीत्या मृत पावलेल्यांचे नातेवाईकच या सामानाची खरेदी करतात. असे शहरातील अंत्यविधीचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी सांगितले.
चौकट -
प्लास्टिकची विक्री वाढली
मृत झालेल्या कोरोना रुग्णाचा मृतदेह झाकण्यासाठी विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक वापरले जाते. सध्या या प्लास्टिकची विक्री वाढली आहे. यातही दोन प्रकार असून रुग्णालयानुसार प्लास्टिक निवडले जाते. काही रुग्णालय अगदी साध्या प्रकारच्या प्लास्टिकमध्ये मृतदेह पॅक करतात तर काही रुग्णालये यासाठी चांगल्या दर्जाचे प्लास्टिक वापरतात. साध्या प्लास्टिकसाठी ५०० तर चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकची किंमत ८०० ते ९०० रुपयांपर्यंत आहे.
कोट -
कोरोनामुळे मृतांची संख्या वाढली असली तरी अंत्यविधीच्या सामानाची विक्री वाढलेली नाही. कारण ते मृतदेह पॅक करुन थेट स्मशानभूमीत पाठविले जातात. मागील महिनाभरात मी नैसर्गिकरित्या मृत झालेल्या ३० ते ४० जणांसाठीच अंत्यविधीच्या सामानाची विक्री केली आहे. - नितीन भागवत, भद्रकाली कुंकू भांडार, नाशिक