नांदूरवैद्य : दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गावातील गल्लीबोळात सांडपाणी साचलेले दिसून येत असून, तुंबलेले नाले, गटारी व कचऱ्याचे ढीगही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. घाणीचे प्रमाण वाढल्यामुळे माश्या व डासांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रादुर्भावामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीने गावात वेळीच औषध फवारणी करून माश्या व डासांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यानंतर नांदूरवैद्य येथे कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. प्रत्येक गल्लीत दररोज स्वच्छतेचा नारा दिला जात असला तरी ठिकठिकाणी बारीकसारीक कचºयाचे ढिग आढळून येत आहेत. अनेक गल्ल्यांमध्ये नालेसफाई नसल्यामुळे येथेही मच्छर, माश्यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. मच्छरांच्या या प्रादुर्भावापासून मुक्तता करण्यासाठी औषधाची फवारणी करण्यात यावी, तसेच प्रत्येक कुटुंबाला कीटकनाशक पावडरच्या पाकिटांचे वाटप करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.गावातील नागरिकांनीदेखील स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहातो, वावरतो तो परिसर, घर, घरातील व घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. फवारणीयंत्र अनेक दिवसांपासून नादुरु स्त असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून गावातील घाणीचे साम्राज्य असलेल्या परिसरात औषध फवारणी करण्यात येईल, असे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गावातील गटारींची अवस्था अतिशय बिकट झाली असून, सदर तुटलेल्या गटारींची नव्याने दुरु स्ती करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाजवळील प्रसाधनगृहाची नव्याने बांधणी करण्यात यावी. सदर प्रसाधनगृह अस्वच्छ असल्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.- गणेश मुसळे, ग्रामस्थ, नांदूरवैद्य