नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात स्थापित करण्यात आलेल्या कंट्रोल रूमकडे गत चार महिन्यांत सर्वाधिक तक्रारी या जेवणाच्या गुणवत्तेसंदर्भात होत्या. काही नागरिकांकडून चहा, नाश्ता वेळेवर मिळत नसल्याच्या, तसेच चांगले मिळत नसल्याच्या तक्रारींचा सर्वाधिक तक्रारींमध्ये समावेश होता.
कोरोनाचा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक बहराचा काळ हा एप्रिल आणि मे महिना ठरला होता. या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी कोविड सेंटर, इतकेच नव्हे तर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्येदेखील नागरिकांना भरती करायला जागा मिळत नव्हती. आरोग्य यंत्रणेवर क्षमतेपेक्षा कैक पटींनी अधिक ताण आलेला होता. अशा परिस्थितीत कोणत्याही यंत्रणेच्या व्यवस्थापनात काही त्रुटी राहणे साहजिक असते. मात्र, या त्रुटी नक्की कोणत्या होत्या, याबाबत घेण्यात आलेल्या माहितीत कोरोना सेंटरच्या कंट्रोल रूमकडे दाखल झालेल्या सर्वाधिक तक्रारी या जेवणाच्या गुणवत्तेबाबत, चहा, नाश्ता वेळेवर मिळत नसल्याबाबतच्या होत्या, असे दिसून आले.
इन्फो
बेडसह हॉलमधील अस्वच्छतेच्या काही तक्रारी
१. बहुतांश कोविड सेंटरमध्ये बेडची सुविधा उपलब्ध होती. मात्र, त्यात बेडवरील चादरी ओलसर आहेत, अस्वच्छ आहेत, हॉलमध्ये खाद्यवस्तूंच्या पॅकेटचा कचरा पडून राहतो. याबाबतच्या तक्रारीही काही ठिकाणांहून कंट्रोल रूमला प्राप्त झाल्या होत्या.
२. काही कोविड सेंटरमधील टॉयलेट आणि बाथरूमचा वापर करणाऱ्या अन्य नागरिकांकडूनच स्वच्छ ठेवल्या जात नसल्याच्या, तर काही ठिकाणी दररोज स्वच्छता होत नसल्याच्याही तक्रारी होत्या.
इन्फो
औषधी वेळेवर मिळत नसल्याच्याही तक्रारी
१. कोविड केअर सेंटरमध्ये काही रुग्णांना वेळेवर गोळ्या मिळाल्या नसल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, प्रमाण अत्यल्प होते, तसेच त्या तक्रारींच्या चौकशीत संबंधित रुग्ण गोळ्या वाटपप्रसंगी टॉयलेटला किंवा स्नानाला गेल्याने, तसेच त्यानेदेखील खूप उशिरा विचारणा केल्याने त्यांना उशिरा गोळ्या मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
२. काही केंद्रांवर खोकल्याचे औषधच उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर मिळू शकले नसल्याने खोकला वाढल्याच्या तक्रारीदेखील कंट्रोल रूमला प्राप्त झाल्या आहेत.
-----------------------
कोरोना वाढला त्या एप्रिल मे महिन्याच्या काळात ऑक्सिजन बेडची अनुपलब्धता, तसेच अन्नाच्या तक्रारींचे प्रमाण अधिक होते. मात्र, ऑक्सिजन बेड जसे उपलब्ध होतील, तशी त्यांची व्यवस्था करण्यात आली. जेवणाबाबतच्या तक्रारीदेखील केवळ ज्यावेळी रुग्ण प्रचंड प्रमाणात होते, त्याचवेळी होत्या. अन्य तक्रारींचे प्रमाण यंत्रणेवर आलेल्या ताणाच्या तुलनेत कमी होते.
-डॉ. कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
----------------
कंट्रोल रूमकडे आलेल्या तक्रारी
जेवण गुणवत्ता - ४६७
चहा, नाश्ता वेळेत न मिळणे - ४०७
बेडची अनुपलब्धता - ३८७
कोरोना सेंटर अस्वच्छता - २६३
अन्य किरकोळ तक्रारी - २४६
--------------------
ही डमी आहे.