लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : उच्च न्यायालयाने महापालिकेला दिलेल्या आदेशानुसार मनपा प्रशासनाच्या वतीने शहरात प्रभागनिहाय वृक्षगणनेला सुरुवात करण्यात आलेली असून सहा महिन्यांत जवळपास ११ लाख ८३ हजार वृक्षांची गणना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ व ६ या दोनच प्रभागात आतापर्यंत जवळपास ६ लाख ३२ हजार २०० वृक्षांची गणना झाली आहे. वृक्षगणनेत १५० प्रजाती वृक्षांच्या आढळून आल्या त्यापैकी नऊ जाती दुर्मिळ, तर ४० फळांच्या असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. ३१ डिसेंबर २०१६ पासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्षगणनेला महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. मनपाच्या ३१ प्रभागांत ही वृक्षगणना तंत्रज्ञान वापरून सुरू करण्यात आलेली आहे. तंत्रज्ञानाने सुरू असलेल्या या वृक्षगणनेत झाडांच्या जाती, वय, उंची याची माहिती मिळते. पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये आतापर्यंत ३ लाख ७८ हजार २००, तर प्रभाग ६ मध्ये २ लाख ५४ हजार वृक्षांची गणना झाली असून अजूनही वृक्षगणना सुरूच आहे त्यामुळे शहरातील वृक्षगणनेच्या एकूण आकडेवारीनुसार पंचवटी विभागातच सर्वाधिक वृक्षगणना असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुर्मिळ वृक्षांच्या जातीत दांडूस, शेंद्री, वारस, सुरंगी, रुद्राक्ष, राई आवळा, अडुळसा, महारूख या वृक्षांचा समावेश आहे. यापूर्वी २००७ मध्ये सर्व्हे झाला होता, त्यावेळी अंदाजे १५ ते १६ लाख वृक्ष असल्याचा अंदाज होता, मात्र आता तब्बल दहा वर्षांनी वृक्षगणना होत असल्याने हीच संख्या २५ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचे मनपाच्या सूत्रांनी बोलून दाखविले. पंचवटी विभागात एकूण सहा प्रभाग असून, आतापर्यंत केवळ दोनच प्रभागांत वृक्षगणना सुरू आहे. अजून चार प्रभाग वृक्षगणनेचे बाकी असून, यात आडगाव, नांदूर, मानूर व मळे परिसरातील वृक्षगणना होणार असल्याने पंचवटीतील वृक्षसंपदेचा आकडा वाढणार आहे.
सर्वाधिक वृक्षसंपदा पंचवटीतच
By admin | Published: June 19, 2017 7:08 PM