नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड जाहीर झाली आहे. २५ व २६ फेब्रुवारीला सरपंचपदाची निवड होणार आहे. यामुळे सरपंचपदाच्या निवडीसाठी गावोगावच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुतांश गावातील ग्रामपंचायत सदस्य अज्ञातस्थळी सहलीला रवाना झाले आहेत. तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाचवेळी पार पडल्या. बहुतांश गावांत निवडणूक अटीतटीची व चुरशीची झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांनी नवख्या तरुणांच्या हातात सत्तेचे सूत्र हातात दिले होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या निवडीकडे लागल्या आहेत. अर्ज दाखल करण्यापासून ते सरपंच आरक्षण जाहीर होण्यापर्यंत दोन महिने ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. सरपंचपदाच्या महिला आरक्षण सोडतीनतंर दोन आठवडे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने सरपंचपदाच्या निवडी लांबल्या होत्या. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांचा जीव टांगणीला पडला होता. याबाबतच्या तक्रारी निकाली निघाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनतंर नव्या कारभाऱ्यांकडे गावाची सूत्रे येण्यासाठी तब्बल सव्वा महिन्याचा कालावधी लोटला आहे. अनेक गावातील नव्याने निवडून आलेले सदस्य गेल्या महिन्यापासून सहलीचा आनंद घेत आहे. सरपंचपदाची दावेदारी असणाऱ्या प्रमुखांकडून सदस्यांना सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. २५ व २६ फेब्रुवारीला दोन टप्प्यांत शंभर गावातील सरपंच व उपसरपंच निवडणूक होणार आहे.
---------------
सदस्य देवदर्शनाला तालुक्यातील बहुतांश गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या होऊन अनेक ठिकाणी काठावरचे बहुमत आहे. तर काही भागात महिला आरक्षणामुळे अंदाज बिघडले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना गेल्या १५ ते २० दिवसांपासून सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे सदस्य देवदर्शन व सहलीचा मनमुराद आनंद घेत असल्याचे चित्र आहे.