नाशिक : गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गायी, वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई...., असे मातृत्वाचे वर्णन कवी यशवंत यांनी आपल्या शब्दांत केले आहे. त्याची प्रचिती वडनेरदुमालाच्या पोरजे मळ्यात अनुभवयास आली. ऊसतोडीदरम्यान शेतात अवघ्या काही दिवसांचे बिबट्याची बछडे आढळले. या बछड्यांची डोळे उघडताच जणू आईशी ताटातूट झाली. वनविभागाने इको-एको व वाइल्डलाइफ ट्रस्ट आॅफ इंडिया या वन्यजीवप्रेमी संस्थांच्या मदतीने बछड्यांची आईशी पुन्हा भेट घालून देण्याचा निश्चय केला. वनविभागाच्या अथक प्रयत्नांना गुरुवारी (दि.२३) पहाटेच्या सुमारास यश आले.वडनेरदुमाला शिवारातील त्र्यंबक पोरजे यांच्या गट क्रमांक-९२मधील शेतीत ऊसतोड सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या या वन्यप्राण्याचे तीन बछड्यांना ऊसतोड कामगारांना मंगळवारी (दि.२१) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आढळून आली. त्यांनी तत्काळ ऊसतोड थांबवून पोरजे यांना माहिती दिली. पोरजे यांनी त्वरित वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी यांच्याशी संपर्क साधला. भदाणे यांनी तत्काळ गोसावी यांच्यासह वनरक्षक गोविंद पंढरे, उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे आदींना घेत पोरजे मळागाठला.यावेळी इको-एको फाउण्डेशनचे स्वयंसेवक वन्यजीवप्रेमी वैभव भोगले, अभिजीत खेडलेकर यांनाही बोलविण्यात आले. दरम्यान, बिबट्याची दोन बछडे वन कर्मचाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत सुरक्षितरीत्या प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये ऊसशेतीत झाकून ठेवली होती. संध्याकाळ होताच संपूर्ण परिसर निर्मनुष्य करत वनविभागाच्या पथकाने बिबट्यांची क्रेटवरील उसाची चिपाडे बाजूला करत दिसेल असे केले. त्या दिशेने अॅटोमॅटिक ट्रॅप कॅ मेºयासह वायफायने जोडता येणारा ३६० अंशांत फिरणारा कॅमेराही तैनात केला. वनरक्षकांसह स्वयंसेवक घटनास्थळी कॅमेºयाच्या चित्रीकरणावर नजर ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत बिबट मादी पिल्लांजवळ आली नाही; मात्र बछडे उसात निघून गेल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला.बुधवारी सकाळपासून पुन्हा पोरजे मळ्यात उर्वरित ऊसतोड सुरू करण्यात आली. यावेळी पुन्हा दुपारी १२ वाजेच्या सुमारास बछडे मिळून आले. बछडे पुन्हा वनकर्मचाऱ्यांनी सुरक्षितरीत्या ताब्यात घेत क्रेटखाली झाकून ठेवले. बुधवारी संध्याकाळी पुन्हा बछड्यांची त्यांच्या आईसोबत भेट घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बिबट मादी क्रेटजवळ येऊन पंजाने क्रे ट बाजूला करताना कॅमेºयात कैद झाली. तिने आपल्या दोन्ही बछड्यांना सहजरीत्या तोंडात धरत ऊसक्षेत्र सोडून पलायन केले.
‘त्या’ बछड्यांना आईने घेतले कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:29 PM
गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गायी, वात्सल्य हे बघुनी व्याकूळ जीव होई...., असे मातृत्वाचे वर्णन कवी यशवंत यांनी आपल्या शब्दांत केले आहे. त्याची प्रचिती वडनेरदुमालाच्या पोरजे मळ्यात अनुभवयास आली.
ठळक मुद्देदोन दिवसांनंतर यश : गुरुवारी पहाटे बिबट मादीचे स्थलांतर