सुनील साळुंखे
शिरपूर (जि. धुळे) : दीड महिन्याच्या बाळाला घरात ठेवून कचरा टाकण्यासाठी २८ वर्षीय विवाहिता गॅलरीत आल्या. अचानक गॅलरीचा दरवाजा हवेमुळे बंद झाला. त्यातच घराचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. बाळ घरात एकटाच असल्याने ती कासावीस झाली. मात्र, क्षणाचाही विलंब न करता ती लोखंडी ग्रीलच्या साह्याने तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर उतरल्या. तेथून पाइपच्या साह्याने चौथ्या मजल्यावर जाऊन, मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि बाळाला बघताच तिला अश्रू अनावर झाले. ही घटना आहे, नाशिकच्या पेठ भागातील. तृप्ती जगदाळे-सोनार असे मातेचे नाव आहे.
घरात कसे जावे? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. मात्र, मागील दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी काही क्षणाचाही विलंब न करता ग्रीलच्या साह्याने गॅलरीतून तिसऱ्या मजल्यावर उतरल्या. त्यानंतर मागच्या बाजूला जाऊन पाइपाच्या साह्याने, परत चौथ्या मजल्यावर गेल्या आणि तेथून घरात प्रवेश केला.
घरात शिरताच त्यांनी आधी बाळाला पोटाशी धरले अन् मग बंद झालेला दरवाजा उघडला आणि सुटकेचा निःश्वास सोडला. क्षणभराचा किस्सा; पण गोंधळून टाकणारा. संध्याकाळी सर्वजण घरी आल्यावर सर्वांना ही गोष्ट कळली. सध्या तिच्या हिमतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हवेने दरवाजा बंद झाला...२२ मे रोजी सकाळी घरात कोणी नसल्याने, त्या मुख्य दरवाजा आतून बंद करून कचरा टाकण्यासाठी गॅलरीत गेल्या. यावेळी मल्हार घरात झोपलेला होता. अचानक हवेमुळे गॅलरीचा दरवाजा बंद झाल्याने, त्या बाहेरच राहिल्या.
दाेघेच का थांबले?मूळचे शिरपूर (जि. नाशिक) येथील रहिवासी असलेले जगदाळे-सोनार कुटुंबीय सध्या नाशिकच्या पेठ भागातील अष्टविनायकनगर येथे एका सोसायटीतील चौथ्या मजल्यावर वास्तव्यास आहे. पती स्वप्नील हे तीन वर्षीय मुलगी मृण्मयी हिच्यासह नातेवाइकांकडील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी २१ मे रोजी शिरपूरला आले होते. मात्र, उन्हाचा त्रास होईल, म्हणून पत्नी तृप्ती आणि दीड महिन्यांचे बाळ मल्हार हे नाशिकलाच थांबले होते.