Nashik Viral Video: सासू आणि सूनेमध्ये चांगले संबंध आहेत असं फार क्वचितच पाहायला मिळतं. अनेकदा त्यांच्यात वाद होताना पाहायला मिळतात. पण सासू सुनेमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकरण नाशकातून समोर आलं आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यायालयाच्या गेटवर कौटुंबिक वादतून सासू-सून आणि कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी आणि बाचाबाची झाली. सुरुवातीला महिलांमध्ये सुरु असलेल्या हाणामारीमध्ये कुटुंबातील पुरुषही सामील झाले आणि वाद वाढल्याचे पाहायला मिळालं.
न्यायालयीन सुनावणीसाठी तारखेला समोरासमोर आलेल्या सासू आणि सून यांच्यात झालेल्या हिंसक भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या भांडणाने तिथल्या लोकांना धक्का बसला होता. घरगुती वादातून झालेल्या सासू सुनेच्या मारामारीत पुरुषांसह महिलादेखील एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळते.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच सुनावणीसाठी आले असताना सासू यमूना यशवंत निकम आणि सुनेचा भाऊ दीपक हिरामण साळवे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी या भांडणात उडी घेतली आणि हाणामारी सुरु केली. यावेळी महिला केस ओढत एकमेकांना मारत होत्या तर पुरुष मंडळी हातांनी, पायांनी मारहाण करत होते. लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
शेवटी सरकारवाडा पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात नेले. यादरम्यानही दोन्ही गटाचे लोक एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अशी फ्रीस्टाइल मारामारी झाल्याने, ही घटना दिवसभर न्यायालयाच्या आवारात चर्चेचा विषय बनली होती.