सचिन देशमुख
सोयगाव : प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत मिळविलेल्या यशाची चव अमृताहूनही गोड.
जगात कुणी "अपयश" मागत नाही. कुणी कितीही बाळबोध असो, भोळा असो किंवा हुशार असो, प्रत्येकाला "यश" हवे आहे. जो यशाची आशा सोडतो, तो "अपयशी" ठरतो. जो अनुभवातून शिकायला तयार असतो, तो कधी अपयशी ठरत नाही. कोरोना काळात शाळा बंद, पण ऑनलाइन शिक्षण चालू; पण हे ऑनलाइन शिक्षण आर्थिक परिस्थितीवर अवलंबून. ग्रामीण भागातील पालक बहुतकरून शेती व्यवसाय, मजुरी-रोजंदारी करणारे. दिवसभर काम करून येईल त्यात प्रपंच सांभाळायचा, मग मुलांना शिक्षणासाठी अँड्रॉइड फोन कुठुन घेणार. पण मुलांमध्ये शिकण्याची जिद्द व परिस्थितीची जाणीव असेल तर काहीही अशक्य नाही. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ येथील कर्म. नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालयाची दहावीतील सुनयना रवींद्र देशमुख. वडिलांना अर्धांगवायूचा झटका आलेला, त्यामुळे कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी आईने स्वीकारली. शेतीकाम, शेतमजुरी करून आपल्या मुलीला चांगले शिक्षण दिले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी सुनयनाकडे कोणताही अँड्राॅइड फोन नव्हता व तो घेण्याइतपत इतके पैसेही नव्हते; पण सुनयनाला परिस्थितीची जाण व शिकण्याची जिद्द. त्यामुळे खचून न जाता त्यावर मार्ग शोधला. आपल्या मैत्रिणीकडे जाऊन ऑनलाइन अभ्यास पूर्ण केला तसेच सुनयनाचे घर शाळेपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे तिला शाळेतील शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले. घरकाम, शेतीची कामे व अभ्यास यांचा ताळमेळ साधत तिने कसून अभ्यास केला व बोर्डाच्या परीक्षेत ८७.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाण ठेवून संघर्ष करीत यश मिळविले. तिचा शिकण्यासाठीचा संघर्ष व जिद्द बघून आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. सुनयना विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन सनदी अधिकारी होऊन देशसेवा करण्याचा मानस बाळगून आहे. सुनयनाची शिकण्याची जिद्द, परिस्थितीची जाण व संघर्ष इतरांसाठी प्रेरणादायी असा आहे.
कोट...
सुनयनाची शिकण्याची जिद्द व चिकाटी कौतुकास्पद आहे. आईचे हाल व वडिलांच्या तब्बेतीची जाण ठेवत, खचून न जाता तिने यश संपादन केले. खऱ्या अर्थाने आईच्या कष्टाचे चीज झाले.
हंसराज देसाई, मुख्याध्यापक