नाशिक : शहरातील कॉलेज रोड भागात भटकंती करत लोकांकडे हात पुढे करून मिळेल ते दान पदरात घेत, आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका मातेची धडपड तिच्या भाजलेल्या बाळाला वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी मागील दोन दिवसांपासून सुरू होती. बुधवारी (दि.१०) ही माता आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला खांद्यावर घेऊन कॉलेज रोड भागात दिवसभर भटकंती करत होती. मात्र, कोणत्याही दवाखान्यात या गोरगरीब मायलेकीला दाद मिळू शकली नाही, अखेर शासनाच्या ‘१०८’ रुग्णवाहिकेने आलेल्या ‘कॉल’ला प्रतिसाद देत धाव घेतली अन् त्या मायलेकींना सायंकाळी रेस्क्यू केले.
मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील असलेल्या या मायलेकी काही वर्षांपूर्वी नाशकात रोजगाराच्या शोधात आल्या. मात्र, कुठेही रोजगार मिळाला, तर त्याचे ‘मोल’ मिळू शकले नाही. नियतीने पदरात टाकलेले अठराविश्वे दारिद्र्य झेलत, या महिलेने अखेर समाजापुढे हात पसरण्याचा मार्ग नाईलाजाने स्वीकारला. रस्त्यालगत उघड्यावर मांडलेल्या चुलीवर पोटाची भूक शमविण्यासाठी भाकरी थापत असताना मातेची नजर चुकली अन् दुर्घटना घडली. पंधरवड्यापूर्वीच चिमुकल्या लेकीला आगीच्या ज्वालांची झळ बसल्याने तिची पाठ पूर्णत: भाजली गेली. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या मातेपुढे आपल्या लेकीच्या उपचाराचा मोठा प्रश्न उभा राहिला. तिने शहरातील उच्चभ्रू भागात जेथे दिवसभर भटकंती करत हात पुढे करते, त्या भागातील दवाखान्यांचा उंबराही गाठला. मात्र, पदरी पडली ती निराशाच...!
-इन्फो--
कडाक्याच्या थंडीमुळे असह्य वेदना अन्....
चिमुकलीच्या भाजलेल्या पाठीच्या जखमा भरून न आल्यामुळे कडाक्याच्या थंडीने तिला असह्य वेदना मंगळवारी रात्रीपासूनच होऊ लागल्या होत्या. तात्पुरत्या स्वरूपात ‘दाना’मधून मिळालेल्या रकमेतून त्या मातेने एका मेडिकलमधून मलम घेत, त्या लेकीच्या जखमांवर लावण्याचा प्रयत्नही केला. काही वेळ दिलासा मिळाला. मात्र, संध्याकाळी हवेत गारवा निर्माण होताच, पुन्हा वेदनांनी लेकीचे अश्रू घळाघळा वाहू लागल्याने मातेचे मन हेलावून गेले.
--इन्फो--
‘फूड डिलिव्हरी बॉय’ची जागरूकता
मातेची धडपड अन चिमुकलीची भाजलेली पाठ बघून येथील एका रेस्टॉरंटजवळ आलेल्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या सुशिक्षित जागरूक युवकाचे संवेदनशील मन हादरून गेले. त्या मातेला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि प्रसंगावधान राखत मोबाइलवरून तत्काळ ‘१०८’ क्रमांक फिरविला. काही वेळेत डॉ. शिल्पा पवार या १०८ रुग्णवाहिकेतून कॉलेज रोड येथे दाखल झाल्या अन् तेथील विठूमाउली मंदिराच्या उंबऱ्यावर बसलेल्या या मायलेकीला रेस्क्यू करत रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
---
फोटो आर वर १०ॲम्ब्युलन्स नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
100221\10nsk_16_10022021_13.jpg
===Caption===
१०८ रुग्णवाहिकेचा मिळाला दिलासा