घोटी : इगतपुरी तालुक्यातील विविध भागातून दुचाकी चोरीच्या घटना सुरूच आहे. घोटी शहरालगत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरू असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरगावाहून आलेल्यांनी दुचाकी सुरक्षित पार्किंग करायची कोठे असा प्रश्न दुचाकी चालकांना भेडसावत आहे. १६ सप्टेंबर रोजी खंबाळे शिवारातील नटराज पेट्रोल पंपावरील दोन मोटारसायकल चोरट्यांनी लांबविल्या असल्याची नवीन घटना समोर आली आहे. नाशिक येथे भाजीपाला मार्केट येथे हमाली करणाऱ्या वाकी येथील विजय लहाने व शेणवड येथील यशवंत दिवटे या दोघांनी १५ रोजी पेट्रोल पंपावरील आवारात एमएच १५ बीएल ६६६९ क्रमांकाची काळ्या रंगाची तसेच दुसरी मोटारसायकल हीरो होंडा कंपनीची एमएच १५ डीए ४१३२ क्रमांकाची अशा दोन मोटारसायकली लावून नाशिक येथे कामाला निघून गेले. नाशिकवरून पुन्हा घोटी येथे आले असता त्यांच्या मोटारसायकल त्याठिकाणी नव्हत्या. आसपासच्या परिसरात त्यांनी तपास केले असता कुठेही गाड्या आढळल्या नाहीत. चोरट्यांनी या गाड्यांवर पाळत ठेवून हीरो होंडा कंपनीच्या दोन्ही गाड्या लंपास केल्या आहेत.
-----------------------------
सीसीटीव्ही क्षेत्राबाहेर चोऱ्या
घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या चोऱ्यांमुळे प्रशासनाचा गुन्हेगारांवर जरब असणे गरजेचे असून चोरट्यांचे मोठे रॅकेट पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान घोटी पोलीस ही दुचाकी चोरट्यांच्या मागावर असून लवकरच दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्याचा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, अनिल डुमसें, शीतल गायकवाड, भास्कर शेळके, संदीप मथुरे आदी करीत आहेत. पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही लावलेला असतो. मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग याठिकाणी गाड्या लावून कामाला जात असतात. परंतु चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या क्षेत्र व्यतिरिक्त असलेल्या जागेतील गाड्या चोरी केल्या. याचा अर्थ माहितीगार व्यक्तींचा यात सहभाग असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.