पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत रस्त्याचे काम सुरू असल्याने दुसऱ्या मार्गाने वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काम चालू असल्यामुळे सुरगाणा, हतगड, पुणेगाव, माळे दुमाला अस्वलीपाडा येथे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे दुचाकीस्वारांनी शेता शेतातून पर्यायी मार्गाचा शोध लावला आहे. येथून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची कसरत होत असल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम अडीच ते तीन महिन्यांपासून बंद पडले आहे. यामुळे वाहून गेलेल्या पुलाजवळ वाहनचालकांना जीव धोक्यात घालून शेताच्या बांधाजवळून मार्ग काढून नदीतून कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुलाचे काम कधी पूर्णत्वास येईल, असा सवालही वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. बांधाबांधाने मार्गक्रमण वणी ते पांडाणे हे अंतर पाच किलोमीटरचे असताना रस्ता वाहून गेल्यामुळे प्रवाशांना पांडाणे, पुणेगाव, माळे दुमाला, अस्वलीपाडा या गावांना येताना १५ ते २० किलोमीटरचा फेरा करत जावे लागते. यामुळे बांधाबांधाने का होईना, परंतु फेरा वाचतो व पेट्रोल वाचते म्हणून कसरतीद्वारे वाहनधारक प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.
पुलाचे काम सुरू असल्याने वाहनधारकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 9:18 PM