नाशिक : जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागात बिल जमा करण्यासाठी व काढण्यासाठी ‘मार्चएण्ड’मुळे धावपळ सुरू असून, विविध कामांची बिले जमा करण्याचा रविवारी (दि.३१) अखेरचा दिवस आहे. त्यामुळे मक्तेदारांनी लेखा विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या पाच दिवसांत विविध विभागांतर्गत ६३ कोटींची ३२ बिले कोषागारात जमा झाली आहे.२०१८-१९ आर्थिक वर्षमधील ३१ मार्च रोजी संपत असल्याने येत असल्याने निधी खर्चासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून पळापळ सुरू आहे. वर्षभर कामाचा ताण न घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून बिले जमा करण्यासाठी कसरत सुरू असताना आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी यांचा वावर नसला तरी, मक्तेदारांची गर्दी आठवडाभरापासून दिसत आहे. अवधी कमी असल्याने बिलांची फाइल जमा करण्यासाठी लेखा विभागाबाहेर शनिवारी (दि.३०) मक्तेदारांची गर्दी झाल्याने, विभागाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. याशिवाय बांधकाम विभागातही ठेकेदारांनी गर्दी केली असून, रात्री उशिरापर्यंत बिले काढण्यासाठी लगभग सुरू होती. दि. २५ मार्चपासून आतापर्यंत तब्बल ६३ कोटींची बिले जमा झाली असून, लेखा व वित्त विभागानेही बिले कोषागरात जमा केलेली आहे. बिले जमा करण्याचा ३१ मार्च अंतिम दिवस आहे. त्यामुळे रविवारी साप्ताहिक सुटी असतानाही रविवारी (दि.३१) लेखा व वित्त विभाग खुला असणार असून, बिले जमा होत असताना जिल्हा परिषदेच्या तिजोरीत शासनाकडून निधी वर्ग होत आहे. यात लघुपाटबंधारे विभागांतर्गत बंधाऱ्यांसाठी सुमारे १६ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.निधी वाढीची शक्यतासमाजकल्याण, महिला बालकल्याण व आरोग्य विभागासाठी निधी प्राप्त झाला असून, तीन हजार ५४ लेखाशिर्षकांतर्गत २ कोटी ४५ लाखांचा निधी थेट रस्त्यांसाठी प्राप्त झाला असून, उर्वरित २४ तासांमध्ये निधीची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
‘मार्चएण्ड’मुळे लेखा विभागाला जत्रेचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:27 AM