डोंगररांगांच्या उत्खननाच्या स्थळांचा पाहणी दौरा करण्याबाबत सोमवारी (दि.६) पश्चिम वनविभागाच्या उपवनसंरक्षकांच्या दालनात अशाच एका बैठकीचे सोपस्कार पार पाडले गेले; मात्र दाैऱ्याची तारीख दोन तासांच्या ‘गहन’ चर्चेतदेखील निश्चित होऊ शकली नाही, हे या बैठकीचे दुर्दैवच! मागील महिन्यात २४ तारखेला ब्रह्मगिरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेत नाशिक जिल्ह्यातील प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध गावांच्या शिवारातील डोंगररांगा दगड-खाणी चालविणाऱ्यांकडून सर्व नियम, अटीशर्ती धाब्यावर बसवून उद्ध्वस्त केले जात असल्याचे सांगितले गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने गठीत केलेल्या समितीची सोमवारी वनविभागाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत पाहणी दौरा करण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच ब्रह्मगिरी कृती समिती सदस्यांनी विविध मुद्दे मांडले. यानुसार या आठवड्यात प्रत्यक्षरीत्या भेट देत पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
--इन्फो---
...यांची झाली बैठक
पर्यावरण राज्यमंत्र्यांनी आदेशित करत तातडीने अहवाल सादर करून दोषींविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे फर्मान सुनावून आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला. यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांची एक स्वतंत्र समिती गठीत केली. या समितीमध्ये ‘ब्रह्मगिरी’च्या दोन सदस्यांनाही स्थान देण्यात आले आहे. या नव्या समितीची उपवनसंरक्षक यांनी सोमवारी बैठक घेतली.
--इन्फो--
‘गुपिते’ उघड होण्याची भीती?
ब्रह्मगिरी पर्वतरांग व सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या संवर्धनासंदर्भात पर्यावरणाच्यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीपासून पत्रकारांना वनखात्याकडून दूर ठेवण्यात आले. उपवनसंरक्षकांच्या दालनात दोन तास झालेल्या या बैठकीला पत्रकारांना मात्र उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले गेले. यामुळे बैठकीत अशी कोणती ‘गुपिते’ उलगडण्याची भीती उपस्थित वन, महसुलाच्या अधिकाऱ्यांना वाटत होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
--इन्फो--
कृती समितीने मांडलेले मुद्दे असे...
डोंगररांगांमध्ये उभ्या उत्खननाला बंदी तरीही सर्रासपणे उत्खनन सुरू.
ब्रह्मगिरीचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन असतानाही जिलेटिनचे स्फोट कसे घडले?
संतोषा-भागडी डोंगररांगेतील जैवविविधतेचा सर्रास होणारा ऱ्हास केव्हा थांबणार?
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन कसे झाले?
सारुळ शिवारात सांतोषा, भागडी डोंगरांच्या पायथ्याशी रात्रीचे उत्खनन कधी थांबणार?