कळवण : कोरोना प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून बंद असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंग गडावरील मंदिर उघडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. मंदिर उघडण्याची आर्त हाक देत स्थानिक ग्रामस्थ व व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी यावेळी झाली. रविवारी (दि.१८) सप्तशृंग गडावरील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगनराव भुजबळ यांची नाशिक येथे भुजबळ फार्म हाऊस येथे भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मार्चपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आली आहेत. पर्यायी भाविक व त्या अनुषंगाने सेवा सुविधा संपूर्णतः बंद आहेत. श्री क्षेत्र सप्तशृंग गड या तीर्थक्षेत्राचा परिसर हा संपूर्णतः दुर्गम व गरीब लोकवस्तीचा आहे. येथील संपूर्ण अर्थकारण हे श्री भगवती मंदिर व भाविकांच्या संबंधित असलेल्या विविध सेवा-सुविधांवर आधारित आहे. मागील चार महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे प्रचंड हलाखीचे दिवस सुरू असून, त्यांच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी मंदिर व त्यासंबंधित सर्व सेवा-सुविधा शासकीय नियमाअंतर्गत सुरू होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी सप्तशृंग गड व्यापारी संघटना अध्यक्ष अजय दुबे, शांताराम गवळी, योगेश कदम, बंटी गुरव, बाबा तिवारी, कैलास सदगीर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू बर्डे, राजेश गवळी, शांताराम सदगीर उपस्थित होते.
----------------------
अनेक कुटुंबे स्थलांतरित बेरोजगारीमुळे सप्तशृंग गडावरील अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत, तसेच व्यवसाय वा मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले बँकांच्या कर्जाचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे व्यापारी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत, तरी हप्त्यांची मुदत वाढवून मिळण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा होणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने कोविड -19 संबंधित लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार होऊन महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.