अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सपाट पठारी भागावर अनेक ऐतिहासिक भुईकोट किल्ले, गढी आणि वेशी असलेली गावे आहेत. परंतु त्यामध्ये आता नव्याने भर पडली आहे ती एका भोरवाडी गिरीदुर्गाची. नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी या किल्ल्याचा गिरीभ्रमंतीदरम्यान शाेध घेतला आहे. हरिश्चंद्रगडापासून सह्याद्रीची उपरांग थेट पारनेर शहराच्या दिशेने जाते. पारनेरच्या दिशेने जाताना ह्या उपरांगेची उंची कमी कमी होत जाते. त्यावरील मांडओहोळ धरणाजवळील म्हसोबाझाप ग्रामपंचायतीतील भोरवाडी येथील किल्ला आतापर्यंत कधीही प्रकाशझोतात आलेला नव्हता. कुलथे यांनी परिसरात असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती आणि अभ्यास करताना भोरवाडी किल्ल्याचा शोध घेतला.
भोरवाडी किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची दोन हजार ८२४ फूट (८६० मीटर) असून, किल्ल्याची चढाई सोप्या श्रेणीची असल्याचे कुलथे यांनी सांगितले. म्हसोबाझाप गावाच्या १२ वाड्या असून, यापैकी कण्हेरवाडी आणि भोरवाडी गावातून किल्ल्यावर जाता येते.
--इन्फो--
किल्ल्याची स्थानिक ओळख ‘चुचळा’
या भागातील स्थानिक लोक या किल्ल्याच्या टोकदार निमुळत्या आकारामुळे त्याला चुचळा या नावाने ओळखतात. भोरवाडी गावातून मुख्य किल्ला व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या खिंडीतून वर चढाईचा मार्ग आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंतची चढाई ही फक्त ११० ते १२० मीटर एवढी आहे. किल्ल्यावर चढाई मार्गात खडकातून खोदलेला मार्ग आणि अनेक पायऱ्या कोरलेल्या दिसतात. चढाई मार्गावर तटबंदीचे चिरे ओळीने असल्याचे पहावयास मिळतात. त्यामधून पूर्वी प्रवेशद्वार असावे अशी रचना दिसते. माथ्यावरील सपाटीच्या भागावर गडफेरीदेखील सहज करता येऊ शकते. तेथे दोन पाण्याचे खोदीव टाके आहेत. हे दोन्ही टाके २६ फूट लांब तर १० फूट रुंद इतक्या आकाराचे आहेत. त्यांची खोली साधारणत: १० फूट इतकी असावी. टाके माथ्याकडून वाहून आलेल्या माती-गाळाने निम्मे बुजले गेले आहे. माथ्याच्या उत्तरेकडे पाण्याचे तिसरे टाके असून, तेदेखील याच आकाराचे आहे.
---कोट---
भोरवाडीचा किल्ला हा अहमदनगर, संगमनेर आणि जुन्नर या तीन शहरांच्या मध्यभागी आहेत. तसेच जुन्नर-अहमदनगर महामार्गापासून जवळ आहे. परिसरातील टाकळी ढोकेश्वर या आठव्या शतकातील लेणी या किल्ल्यापासून जवळच आहेत.
अहमदनगर निजामशाहीच्या मुख्य भागात हा किल्ला असल्याने याची निर्मिती आणि इतिहास निजामशाही काळातील टेहाळणी दुर्ग असण्याची शक्यता आहे. भोरवाडीचा किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील एकमेव किल्ला आहे. गिरीदुर्ग अभ्यासक गिरीश टकले यांचेही यासाठी मार्गदर्शन लाभले.
- सुदर्शन कुलथे, गिर्यारोहक, नाशिक
--
फोटो आर वर १२फोर्ट/१/२
120721\12nsk_53_12072021_13.jpg~120721\12nsk_54_12072021_13.jpg
भोरवाडीचा गिरीदुर्ग~भोरवाडी किल्ल्याचे विविध रुपे.