नाशिक- धुळे जिल्ह्यातील लळींग किल्ल्याच्या पर्वतरांगेतील अप्रकाशित रामगड किल्ल्याचा शोध नाशिकमधील गिर्यारोहक व वैनतेय गिर्यारोहण संघाचे विश्वस्त सुदर्शन कुलथे यांनी लावला आहे. धुळे तालुक्यातील सडगाव येथील हा रामगड हा धार्मिक डोंगर नसून तो एक गिरीदुर्ग असल्याचे कुलथे यांनी प्रकाशात आणले आहे.
काही वर्षांपूर्वी लळींग किल्ल्याच्या परिसरात भटकंती दरम्यान या पर्वत रांगेवर धार्मिक डोंगर असून त्यावर पाणी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून कुलथे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शोध घेऊन अभ्यास केल्यानंतर हा नवा किल्ला प्रकाशात आला असून त्यामुळे गड किल्ल्याच्या यादीत आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. धुळे शहरापासून लगतच असलेल्या लळींग किल्ल्यापासून पश्चिमेकडे ११ किलो मीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याथी सडगाव किंवा हेंकळवाडी ही गावे आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगावहून दहीदी- अंजनाळे- सडगाव असा मार्ग असून हा किल्ला चढाईला सोप्या श्रेणीतील आहे. त्यामुळे अर्ध्या तासात गडमाथा गाठता येतो. या किल्ल्यावर असलेली खेादीव पाण्याची टाकी आणि माथ्यावरील ज्योती यामुळे हा किल्लाच असल्याचे स्पष्ट होते. लळींग पर्वतरांग पूर्व ते पश्चिम अशी पसरली आहे. पूर्व टोकावर लळींग किल्ला तर पश्चिम टोकावर रामगड आहे. लळींग आणि गाळणा किल्ल्याच्या मध्यभागी रामगडाचे सरळ रेषेत अंतर मोजले तर लळींग दहा किमी आणि तर गाळणा किल्ला बारा किलोमीटर आहेत. रामगडाच्या माथ्यावरून काेणत्याही अडथळ्याविना दोन्ही किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. त्यामुळे रामगड किल्ला हा या दोन्ही किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी चौकीचे ठिकाण असावे असे सुदर्शन कुलथे यांनी सांगितले.
नाशिकमधील प्रसिध्द इतिहास अभ्यासक आणि गिर्यारेाहक गिरीश टकले यांचे या किल्ल्याच्या शोध आणि अभ्यासासाठी विशेष मार्गदर्शन लाभले असे कुलथे यांनी सांगितले. हा गिरीदुर्ग असण्याच्या शक्यतेला त्यांनीही दुजोरा दिला आहे. याशिवाय राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, अविनाश जोशी, मनोज बैरागी हे दुर्ग शोध मोहिमेत सहभागी झाले होते.
इन्फेा...
फारूखी सुल्तानांनी लळींग किल्ला वसवला. त्या काळात टेहळणीच्या कामासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. ब्रिटिश काळात बंडाच्या वेळी होळकरांच्या कागदपत्रात या किल्ल्याबाबत अधिक माहिती असण्याची शक्यता इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी वर्तवली आहे.
कोट...
या किल्ल्याचा अभ्यास केला तर पाण्याची साठवणूक आणि गडमाथ्याचा परीघ याचा विचार करता अगदी जुजबी शिबंदी येथे असावी. पहारा देणे आणि चौकी म्हणून वापर करणे इतकेच त्याचे कार्य मर्यादित असावे असे दिसते. त्याचे नाम रामगड कसे पडले ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या गुरूवार सोडला तर या रामगडावर कायम गर्दी असते.
सुदर्शन कुलथे, गिर्यारोहक
---------
छायाचित्र आर फेाटोवर ०९ रामगड व ०९ रामगड१