बोलठाण (ता. जि. नाशिक) : नांदगाव तालुक्यातील घाटमाथा परिसरात शुक्रवारी (दि.२४) मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. यावेळी शेतातून बैलगाडीने घरी परतणाऱ्या एक शेतमजूर महिलेसह दोन नात्याने असलेल्या चुलतबहिणी जातेगाव परिसरातील खारी नदी पार करीत असताना बैलगाडी उलटल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील शेतमजूर महिलेसह एका मुलीचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या एका मुलीचे शोधकार्य सुरू आहे. सदर दुर्घटनेमुळे घाटमाथा परिसरात शोककळा पसरली आहे.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव परिसरात महादेव डोंगर व आडगांव परिसरात शुक्रवारी (दि.२४) दुपारी अचानक मुसळधार पाऊस झाला. शेतकरी व शेतमजूर शेतीची कामे आटोपून घराकडे परतत होती. जातेगांव हद्दीतील खारी नदीच्या मार्गातून घरी जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने आडगांव येथील शेतमजूरांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची बैलगाडी पाण्यात उलटली. या पाण्याच्या प्रवाहात सापडलेल्या पाच शेतमजूरांची पाण्यातून कशीबशी सुटका झाली परंतु सौ.मिनाबाई दिलीप बहिरव (वय ४५),कु.साक्षी अनिल सोनवणे (वय ११) व कु. पूजा दिनकर सोनवणे (वय १५) सर्व रा. आडगांव ता. कन्नड जि. औरंगाबाद या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या. त्यांना पाण्याच्या प्रवाहात वाहून जातांना वाचविण्याचा काहींनी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्या हाती लागू शकल्या नाही. सदर घटनेची वार्ता परिसरात पसरली. यावेळी पोलिस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. शोधकार्य सुरू केले असता सौ.मिनाबाई दिलीप बहिरव व कु.साक्षी अनिल सोनवणे यांचा मृतदेह पोलिस प्रशासन व नागरिकांच्या अथक प्रयत्नांतून शोधून काढण्यात यश आले. तर पूजा दिनकर सोनवणे हिचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.दुर्घटनेमुळे शोककळासापडलेले दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे बोलठाण पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अनिल गांगुर्डे यांनी सांगितले. पोलिस प्रशासनाकडून पोलिस नाईक अनिल गांगुर्डे, प्रदिप बागूल तसेच महसूल विभागाकडून जे.एम. मलदोडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी शोधकार्य हाती घेतले असून परिसरात सदर दुर्घटनेमूळे एकच शोककळा पसरली आहे.