मालेगाव : देवदर्शनासाठी निघालेल्या तालुक्यातील दरेगाव, सायने, वडगाव व परिसरातील भाविकांच्या वाहनाला उस्मानाबाद जिल्ह्यात अपघात झाला. या अपघातात तालुक्यातील चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे. चौघा तरुणांवर काळाने झडप घातल्यामुळे सर्वत्र शोकमग्न वातावरण दिसून आले. मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या चौफुलीवरील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. या घटनेमुळे मृतांच्या नातेवाइकांनी एकच हंबरडा फोडला होता. शुक्रवारी शोकाकुल वातावरणात चौघा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिरुपतीच्या दर्शनासाठी मालेगाव तालुक्यातील भाविक टेम्पो ट्रॅव्हल्स्ने निघाले होते. त्यांचे वाहन उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावाजवळ आले असता, टायर फुटला. ते बदलण्यासाठी वाहन उभे केले असता, एमएच २० ईजी १५१७ क्रमांकाच्या टेम्पोने पाठीमागून धडक दिली. या धडकेत शरद विठ्ठलराव देवरे (४४) रा.वडगाव, विलास महादू बच्छाव (४६) रा. सायने बु।।, जगदीश चंद्रकांत दरेकर (४५), सतीश दादाजी सूर्यवंशी (५०) दोघे रा. दरेगाव यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजय बाजीराव सावंत (३८) भरत ग्यानदेव पगार (४७) दोघे रा. सायने बु।।, गोकुळ हिरामन शेवाळे (३८) रा. लोणावळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती दरेगाव, सायने व वडगावला मिळताच, शोक व्यक्त करण्यात आला. गावात शोकाकुल वातावरण दिसून आले. अपघातातील मृतांच्या नातेवाइकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली होती. मृत विलास बच्छाव यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. शेती व जोडधंदा म्हणून वाहन व्यवसाय ते करत होते, तर जगदीश दरेकर यांच्यापश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई, वडील, भाऊ, काका असा परिवार आहे. त्यांचा खडी क्रेशरचा व्यवसाय होता, तर सतीश सूर्यवंशी यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भावजई, पुतणी असा परिवार आहे. त्यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. शरद देवरे यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याचा खडी क्रेशरचा व्यवसाय आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत होता.
फोटो फाईल नेम : २३ एमजेयुएल ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव शहरालगतच्या चाळीसगाव फाट्यावर व्यावसायिकांनी पाळलेला बंद.
230721\23nsk_1_23072021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.