लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सत्तेवर येण्यापूर्वी गोरगरीब जनतेला दिलेले कोणतेही आश्वासन न पाळलेल्या भाजपा सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केल्याचा आरोप करीत शहर कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत येऊन २६ मे रोजी तीन वर्षे होत असून, त्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सत्तेत आल्यास १०० दिवसांत विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक गरिबाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, अशी आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात अद्याप भारतात कोणताही काळा पैसा आला नाही की कोणाच्याही खात्यावर १५ लाख रुपये जमा झालेले नाहीत. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच आहेत. शेतमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला कर्जमाफी दिली जात नसल्याने रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. समृद्धी महामार्गाला जमिनी घेऊन लोकांना उघड्यावर पाडण्याचे काम सरकारकडून करण्यात येत आहे. कायदा व व्यवस्था मोडीत निघाली असून, आतापर्यंत १२५ निरपराध जणांचे खून झाले आहेत. कॉँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात असलेले ‘सच्चे दिन’ संपुष्टात आणून भाजपा सरकारने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून फसविल्याचा आरोप कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनात कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्ते नगरसेवक डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक वत्सलाताई खैरे, आशा तडवी, जॉय कांबळे यांच्यासह लक्ष्मण जायभावे, पंडित येलमामे, बबलू खैरे, उद्धव पवार, उमाकांत गवळी, मीराताई साबळे, गोपाळ जगताप, नितीन काकड, वसंत ठाकूर, कैलास कडलग आदी सहभागी झाले होते.
मोदी सरकारविरोधात आंदोलन
By admin | Published: May 26, 2017 12:24 AM