नाशिक : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची आघाडी करण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूच्या नेत्यांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून भाजपाच्या जिल्हा परिषदेतील एका विद्यमान पदाधिकाऱ्याने मुंबईला माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते.दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नवनिर्वाचित काही जिल्हा परिषद सदस्यांनीही आमदार छगन भुजबळ यांची मुंबईला भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते. भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करीत अध्यक्षपद पदरात पाडण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. न्यायालयीन तारखेदरम्यानच राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या मंदाकिनी बनकर यांचे पती माजी आमदार दिलीप बनकर, कै. वसंत पवार यांच्या कन्या अमृता पवार, जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार, संजय बनकर, महेंद्रकुमार काले, विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, यावेळी पक्षाचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे, अशोक नागरे, पंचायत समिती सदस्य रत्नाकर चुंबळे यांनीही यादरम्यान शुक्रवारी आमदार छगन भुजबळ यांची भेट घेतल्याचे समजते. तूर्तास राष्ट्रवादीचे संख्याबळ १९, तर भाजपाचे संख्याबळ १६ असून, त्यांना बहुमताच्या ३७ या जादूई आकड्यासाठी अजून दोन सदस्यांची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
भाजपा-राष्ट्रवादीच्या हालचाली गतिमान
By admin | Published: March 04, 2017 1:05 AM