नाशिक : शहरातील एनबीटी विधी महाविद्यालायातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. ३) स्वच्छता गृहांच्या स्वच्छतेसाठी महाविद्यालयाच्या आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी तसेच स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होण्यासाठी आंदोलन केले. एनबीटी महाविद्यालाय प्राचार्यांसाठी व प्राध्यापकांसाठी स्वच्छ व सुंदर स्वच्छतागृह असून त्यात हात धुण्यासाठी हँडवॉशसह, साबन यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता व दुरावस्थेमुळे प्रचंड दुर्गंधीचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत असून या स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका असल्याचा आरोप महाविद्यालयाील विद्यार्थ्यांनी केला आहे. एकीकडे प्राध्यापकांना व प्राचार्यांना चकचकीत स्वच्छतागृहाची सुविधा मिळत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या फीच्या पैशावर चालणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या स्वच्छतागृहांमध्ये आऊटलेट पाईप, पाण्यासारखा साधारण सुविधाही उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी महाविदयालयाच्या आवारात आंदोलन करून महाविद्यालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी माती साचलेल्या कुलरला पुष्पहार अर्पण करून पूजा केली. त्याचप्रमाणे स्वच्छता गृहामध्येही पूजा करून अस्वच्छतेचा निषेध केला. महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता असली तरी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून स्वच्छतागृहामध्ये मातीचे थर जमा होऊन त्यात जंतू तयार झाले असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भिती विद्यार्थ्यांमध्ये पसरली असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तुषार जाधव यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रथनिधी महेश गायकवाड यांच्यासह वैभव वाकचौरे, शरद आडके, विनोबा गोळेसर प्रतिम शिरसाठ, अभिजित गवते, विवेक वाजे आदी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशानाविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलनात सहभाग घेतला.
अन्याय सहन कसा करायचा शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे. परंतु कायद्याचे आणि न्यायचे शिक्षण देणाºया संस्थेतच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांची पायमल्ली होत असले तर हा अन्याय कसा सहन करायचा असा सवाल उपस्थित करीत विद्यार्थ्यांनी सुमारे दोन तास महाविद्यालयाच्या आवारात प्रशानाविरोधात घोषणाबाजी केली.