वडांगळी : सिन्नर तालुक्यातील वडांगळी वीज उपकेंद्रातून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आठ पैकी केवळ चार तास वीजपुरवठा सुरूराहत असल्याने शेतकऱ्यांनी वडांगळी वीज उपकेंद्रात सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. वडांगळी वीज उपकेंद्रावरील सर्व फिडरवरून सुरळीत विद्युत पुरवठा करण्याबाबतचे निवेदन परिसरातील शेतकऱ्यांनी सिन्नर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता व्ही. डी. इंगळे, वडांगळी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता एम. पी. खर्जे यांना दिले. वडांगळी फिडरवर प्रमाणापेक्षा जास्त विद्युतभार वाढला आहे. खडांगळी फिडरवर पिंपळगावचा अतिरिक्त भार वाढला आहे. त्यामुळे एकही फिडरवरुन वीज सुरळीत चालत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुसळगावहून वडांगळीला येणारी ३३ केव्हीची वाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहे. सदरील वाहिनीवरील चार उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जात असल्याने भार वाढत आहे. त्याकरिता सदर वाहिनी नव्याने टाकण्यात यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या अडचणी दूर करून आठ तास थ्रीफेज विद्युत पुरवठा करण्यात यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना भेटून न्याय मागण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे व्ही. डी. इंगळे यांनी सांगितले. भार कमी करण्यासाठी पाच उपकेंद्रापैंकी मुसळगाव व निमगाव-सिन्नर उपकेंद्र वेगळे करण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. मुसळगाव उपकेंद्र लवकरच वेगळे होईल, असे ते म्हणाले. तर निमगाव-सिन्नर उपकेंद्र म्हाळसाकोरे उपकेंद्रावर जोडण्यात येणार असल्याचे आश्वासन सांगितले. वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे लेखी आश्वासन इंगळे यांनी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिले. यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सुदेश खुळे, कडवा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष सतिष कोकाटे, कचरु खुळे, भास्कर चव्हाणके, अशोक चव्हाणके, किरण खुळे, दत्तात्रय खुळे, बाळासाहेब खुळे, उत्तम खुळे, माधव खुळे, दिनकर कोकाटे, सुनील गिते, दीपक अढांगळे, दत्तात्रय भोकनळ, अविनाश खुळे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
शेतकऱ्यांचे वीज उपकेंद्रात ठिय्या आंदोलन
By admin | Published: September 09, 2016 12:33 AM