सटाणा (नाशिक) : मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि.कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकीच्या नावावर कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करून चार महिने उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या चारशे ते पाचशे गुंतवणूक दारांनी आज दुपारी शहरातून मोर्चा काढून सटाणा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यासमोर एक तास ठिय्या देऊन पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली.शहरासह तालुक्यातील गोरगरीब शेतमजूर, घरकाम करणाऱ्या शेकडो महिला व पुरुषांनी गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि.कंपनीच्या शहरातील शाखेत सोन्याच्या नाण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांच्या ठेवी जमा केल्या होत्या.मात्र अचानक 3 फेब्रुवारी 2016 रोजी रात्रीतून गाशा गुंडाळून शाखा बंद केली.त्यानंतर ठेवी धारकांनी कंपनीच्या वरिष्ठांकडे चौकशी केली असता व्याजासह पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात मात्र वर्ष दीड वर्ष उलटूनही पैसे न मिळाल्याने शेकडो ठेवी धारकांनी सटाणा पोलीस ठाण्यात गेल्या 6 जुलैला कंपनीचे संचालक लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर ,विजय शंकर तावरे दोघे राहणार विरार ,मुंबई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर साडे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आला.मात्र मात्र चार महिने उलटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त चारशे ते पाचशे ठेवीदार महिला व पुरुषांनी आज दुपारी 1 वाजता शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढला.ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने हा मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला.यावेळी संतप्त महिलांनी हल्लाबोल करून पोलीस प्रशासना विरुद्ध घोषणाबाजी केली.यावेळी पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी मोर्चेकर्यांना सामोरे जात मैत्रेय कंपनीने फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून लवकरच ठेवीदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
नाशिकमध्ये मैत्रेय सुवर्णसिद्धी विरोधात गुंतवणूकदारांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 4:29 PM