नाशिक : कश्यपी धरण पूर्ण भरल्याने या धरणाची गळती रोखण्याबरोबरच गेटचे काम करून स्थानिकांना तेथे जाण्यापासून मज्जाव करण्यासाठी पाटबंधारे खात्याने सुरू केलेल्या कामाला प्रकल्पग्रस्तांनी हरकत घेत काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षभरापासून महापालिकेत नोकरी मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांच्या तोंडाला प्रशासनाने निव्वळ पाने पुसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. कश्यपी धरण बांधण्यासाठी देवरगाव, धोंडेगाव, गाळोशी, खाड्याची वाडी आदि गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीचा मोबदला देतानाच प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नाशिक महापालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २३ मुलांना नोकरीत घेण्यात आले, नंतर मात्र ३७ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. शासकीय दरबारात वेळोवेळी पाठपुरावा करतानाच प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाच्या माध्यमातूनही सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची तड लागत नाही तोपर्यंत धरणावर कोणतेही काम करू नये अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सोमनाथ मोंढे, नंदाबाई मोंढे, प्रकाश बेंडकोळी, दगडू धोंगडे, महेंद्र बेंडकोळी, नारायण मोंढे आदिंनी दिला आहे. (प्रतिनिधी)
‘कश्यपी’च्या बांधकामास ग्रामस्थांकडून हरकत
By admin | Published: October 21, 2016 2:20 AM