नांदूरवैद्य : कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाउन केल्याने सर्वत्र कामधंदे बंद झाले आहेत. हातावर पोट असलेल्या आदिवासी गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आदिवासींना शिधापत्रिका नाही त्यांना ती मिळावी व शासनाने जीवनाश्यक वस्तू शिधापत्रिकेवर द्याव्यात, या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने इगतपुरी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच तहसीलदार परमेश्वर कोसुळे यांना निवेदन देण्यात आले.दरम्यान, संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयात आदिवासींना शिधापत्रिका नाही त्यांना ती मिळावी व शासनाने जीवनाश्यक वस्तू शिधापत्रिकेवर द्याव्यात, या मागणीसाठी जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणीही झाली, परंतु अद्यापही या गरिबांना शिधापत्रिका मिळाल्या नाही, या अनुषंगाने विवेक पंडित यांच्या आदेशानुसार संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष संजय शिंदे व नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नीता गावंडा, तालुका सचिव शांताराम भगत यांच्या नेतृत्वाखाली लॉकडाउनच्या नियमांचे पालन करून आंदोलन केले. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, विनोद गोसावी, सचिन देसले यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करून लवकरच शिधापत्रिका देण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.