नाशिकरोड : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. अचानक मोठ्या संख्येने पोलिसांचे संचलन बघून रहिवाशांमध्ये कुठे काही झाले का अशी चर्चा सुरू होती. मात्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे प्रभाकर रायते यांच्या उपस्थितीत नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शीघ्र कृती दल, गृहरक्षक दलाचे जवान यांनी शुक्रवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास बिटको चौकातून संचलनास सुरुवात केली. जामा मस्जिद, देवळालीगाव, सोमवार पेठ, कब्रस्तान, मालधक्का रोड, तक्षशिला शाळा, सुभाषरोड, आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळामार्गे नाशिकरोड पोलीस ठाण्यापर्यंत संचलन केले. सायरन वाजवत पोलीस व्हॅन, बंदूकधारी पोलीस व संचलनात मोठा पोलीस ताफा असल्याने रहिवाशांमध्ये कुठे काही झाले का, अशी चर्चा व भीती व्यक्त केली जात होती.
नाशिकरोड परिसरात पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:04 AM