मालेगाव कॅम्प : मालेगाव शहर तालुक्यातील वीज कंपनीच्या वीजपुरवठा करणाºया यंत्रणेची दुरवस्था झाली आहे. जीर्ण तारा, कमकुवत खांब यामुळे वारंवार होणाºया अपघातांमुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहेच, तर वीज कंपनीच्या कर्मचाºयांनीदेखील याची धास्ती घेतली आहे. यावर काही उपाययोजना कराव्यात व आमचा जीव वाचवावा अशा मागणीचे निवेदन कर्मचाºयांनी कंपनीच्या अधिकाºयांना दिले.मालेगाव मंडळ अंतर्गत सर्वच विभागामध्ये जुनाट सडलेले खांब, तुटलेले सीमेंट विद्युत खांब व पुरवठा करणाºया तारा जीर्ण झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत या तारा विद्युत भारीत आहे. ही अतिशय धोकादायक बाब आहे. या खांबांमुळे मोठा अपघात घडू शकतो. मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अनेक नागरिकांनीदेखील तक्रारी केल्या आहेत. वीज कर्मचाºयांनीदेखील तोंडी तक्रारींचा पाढा अधिकारी व संबंधित कार्यालयात वाचला आहे. तरीदेखील यावर कारवाई शून्य आहे. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी तांत्रिक युनियन कामगार संघटनेने अधीक्षक अभियंता यांना लेखी निवेदन देत एकदिवसीय निदर्शने व धरणे आंदोलन करून वीज कंपनीच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करून कंपनीस घरचा आहेर दिला आहे. वीज कंपनीच्याच कर्मचाºयांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगून वरिष्ठ अधिकाºयांना जाब विचाराला आहे तर शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात आज वीज कंपनीच्या तारांचे जंजाळ सर्वत्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तारा जमिनीकडे कमी अंतरावर लोंबलेल्या आहेत. बºयाच वेळेस जोरदार वारा व पावसाच्या सरीमुळे व झाडांच्या फांदी अशा अडचणीमुळे बिघाड निर्माण होतो. तारा तुटतात व किरकोळ अपघात होतात. साधारण वर्षभरात अनेक लहान मोठ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये या वीज तारा व जीर्ण खांबांबाबत भीती आहे. महा वितरणाच्या जुन्या व लघु उच्चदाब वाहिनींच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटना कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. कर्मचारी व अधिकाºयांमध्ये यापूर्वी याबाबत अनेक चर्चा झाल्या आहे परंतु त्या निष्फळ ठरल्या आहेत. अपघाती क्षेत्र, खराब तारा, गंजलेले खांब या गोष्टी अनेकदा समोर दाखवून हा धोका अद्याप कमी झालेला नाही. एखादा अपघात व तांत्रिक बिघाड झाल्यास सरळ एखाद्या कर्मचाºयांवर त्याचे खापर फोडले जाते व वेळकाढू धोरण अवलंबले जाते. त्यामुळे यावर त्वरित उपाययोजना कराव्यात व सर्व सामान्य नागरिक व वीज कर्मचारी यांच्या जिवाची पर्वा करून काही उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे. आंदोलनात युनियनचे मंडल अध्यक्ष सचिन भामरे, सचिव दीपक भामरे, विभागीय अध्यक्ष नागपरे, संघटक व्यवहारे, प्रवीण वाघ, अरुण देवरे, राजू बोरसे, संदीप शेवाळे, दीपक शिंदे, रवि खैरनारसह युनियनचे सदस्य व कर्मचारी सहभागी झाले होते.