शहरातील भाजीबाजार स्थलांतरीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सिन्नर शहर व तालुक्यात रविवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला. सोमवारी केवळ अत्यावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरू होती. किराणा दुकान, दूध, भाजीपाला, औषधालय व रुग्णालय सुरू होते. बससेवा बंद असल्याने बस स्थानकावर शुकशुकाट होता.नाशिक-पुणे महामार्गावर खासगी वाहनांची गर्दी दिसून येत होती. तर शिर्डी महामार्गावर वाहतूक रोडावल्याचे चित्र होते. पुण्याहून नाशिकच्या दिशेने मोठ्या संख्येने वाहने येताना दिसून येत होती. शहरात किराणा दुकान, गिरण्या, भाजीपाला घेणे यासाठी थोड्या-फार प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आली. प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात होते. शहरात औषध फवारणी व धुराणी करण्याचे काम नगरपालिका प्रशासनाकडून सुरु होते. शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. सकाळी शहरात जंतुनाशक औषधांची फवारणी केली जात होती तर सायंकाळी धुराणी केली जात आहे. नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी वारंवार ध्वनिक्षेपकावरून आवाहन केले जात होते. शहरात रिक्षा फिरवून नागरिकांची जनजागृती केली जात आहे.
सिन्नर शहरातील भाजीबाजार स्थलांतरीत करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 6:01 PM