एकलहरे : येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्राच्या ६६० मेगावॅट औष्णिक वीज प्रकल्पाचे काम तसूभरही पुढे सरकत नसताना मात्र येथील राखेच्या बंधाऱ्याजवळ ८ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्यासाठी जागेची निश्चितीही करण्यात आली आहे.
औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत कोळसा पोहोचविणे खर्चिक बाब असल्याने अशा प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरत आहे. त्यामुळे असे प्रकल्प वाढविण्यापेक्षा आहे त्या स्थितीत ठेवून तेथील जागांवर सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प उभारण्याची योजना असल्याने एकलहरे येथील जागेत सोलर पॉवर प्लांट उभारला जाऊ शकतो, असे संकेत राज्याच्या होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी यापूर्वीच दिले होते. एकलहरे येथील रोजगार कमी होऊ नये म्हणून या ठिकाणी सोलर प्लांटचा पर्याय असल्याचे बोलले जात आहे.
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पवन आणि सौरऊर्जा वीज निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रस्तावित आहे. यासाठी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने नवीन प्रकल्पांच्या उभारणीसाठी ग्रीन एनर्जी कँरिडॉर योजना राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणुन एकलहरे येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्यासाठी येथील वसाहतीतील रेल्वेलाईन जवळील जुनी डी टाईप क्वॉर्टर्सची मोकळी जागा, राखेच्या बंधाऱ्याभोवतालची जागा व हिंगणवेढे- जाखोरी रस्त्यालगतची मोकळी जागा यांची पाहणी करण्यात आली. अंतिमतः जाखोरी रस्त्याजवळील जागेवर शिक्कामोर्तब झाले. त्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या मुंबई स्थित एका कंपनीला एकलहरे राखेच्या बंधाऱ्या पलीकडील हिंगणवेढे रस्त्यालगतची महानिर्मिती कंपनीच्या अखत्यारीतील १८ हेक्टर मोकळी जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया स्थापत्य विभागामार्फत करण्यात आली आहे. यापैकी १६ हेक्टर जागेवर ८ मेगावॅटचे प्रत्यक्ष सौर ऊर्जा निर्मितीचे पॅनल उभारणी करता येईल, उर्वरित दोन हेक्टर जागा टेकडी व खड्ड्यांनी व्यापली असल्याने मोकळीच राहील. सद्या या मोकळ्या जागेवरील झडेझुडपे काढून साफसफाई करण्याचे काम सुरु आहे.सौर प्रकल्प उभारणी करणाऱ्या कंपनीचे रेडिमेड साईट ऑफिस आणून ठेवण्यात आले आहे.