मालेगाव : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी सोयगावच्या सहा जणांनी येथील सोयगाव फाट्यावरील गिरणानदी पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नदी पात्रात धाव घेऊन जलसमाधी घेणाऱ्यांची समजुत काढली. यावेळी नायब तहसिलदार एस. एम. कारंडे, जगदीश निकम, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.गुरूवारी टेहरे फाट्यावर रस्तारोको आंदोलन झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे. सोयगाव येथील ताराचंद बच्छाव यांनी जलसमाधी घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता.या पार्श्वभूमीवर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच अग्निशमन दलाने नदी पात्रात जीवरक्षक दल तैनात केले होते. शुक्रवारी दहा वाजेच्या सुमारास ताराचंद बच्छाव, भूषण बच्छाव, पिंटु पाटील, जे. पी. बच्छाव, देवा पाटील आदिंनी नदी पात्रात धाव घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रात धाव घेऊन मध्यस्थी केली. जीवरक्षकांनी आंदोलकांना पाण्याबाहेर काढले.यावेळी नायब तहसिलदार कारंडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनावेळी सोनू बच्छाव, चंदू अहिरे, नंदू बच्छाव, राजू सूर्यवंशी, अजय बच्छाव, निखिल पवार, भरत पाटील, राजेंद्र बच्छाव, रामा देवरे, डॉ. किशोर जाधव, पंडित जाधव, राजू सूर्यवंशी, योगेश बच्छाव, बबन बच्छाव, शाम बच्छाव, सदानंद बच्छाव, अमित बच्छाव, भय्या बच्छाव, संजय महाले, दिनेश थोरात, रवि सूर्यवंशी आदि उपस्थित होती. पोलीस उपअधीक्षक हगवणे, अग्निशमन दल विभाग प्रमुख संजय पवार आदि परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.
सोयगाव गिरणा नदीपात्रात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 6:57 PM