मालेगाव कॅम्प : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्युत रोहित्रे गेल्या दीड महिन्यांपासून बंद पडल्यामुळे तालुक्यातील जनतेचे विजेविना प्रचंड हाल होत आहेत. त्याकडे वीज कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी व सदर वीजपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी आमदार दादा भुसे यांनी येथील नवीन बसस्थानकालगतच्या वीज कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. वीज कंपनीकडून रोहित्र दुरुस्तीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अडीच तासांनी सदर आंदोलनमागे घेण्यात आले.मालेगाव वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा सर्वाधिक दूष्परिणाम ग्रामीण भागातील जनतेवर व शेतकऱ्यांवर होत आहे. वीज कंपनी अधिकाऱ्यांच्या मनमानी पध्दतीमुळे जनतेच्या त्रासात अधिकच भर पडत आहे. तालुक्यातील सायने बु., शेजवाळ, टोकडे, करंजगव्हाण, हाताणे, दहिवाळ, गिगाव, कजवाडे आदि गाव परिसरांमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून विद्युत रोहित्र जळाले आहेत. इतर काही ठिकाणी दिवसाआड रोहित्र जळण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने मालेगाव वीज कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु या तक्रारींना संबंधित अधिकाऱ्यांनी केराच्या टोपल्या दाखविल्या. त्यामुळे संबंधित ग्रामीण जनता व शेतकऱ्यांमध्ये वीज कंपनीविषयी प्रचंड संताप आहे. याची दखल घेत आमदार भुसे यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह वीज कंपनी कार्यालयात ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. संबंधित रोहित्र जळाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जात आहे. त्यामुळे त्यापुढील कार्यवाहीस त्याप्रमाणात उशिर केला जात आहे. तसेच जळालेले रोहित्र दुरुस्त करून बसविल्यानंतर पुन्हा तासा दोन तासात ते पुन्हा जळून बंद पडत आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामस्थ व शेतकरी पूर्णत: हवालदिल होत आहेत. तालुक्यात दहा खासगी कंपन्या रोहित्र पुरवठा व दुरुस्ती करतात. तरीही रोहित्रांचा मागणीनुसार पुरवठा होत नाही. मात्र शहरातील काही ठिकाणी रोहित्र जळाल्यास ते त्वरित बदलण्यात येते. त्यामुळे वीज कंपनीकडून शहरी व ग्रामीण असा भेदभाव केला जात असल्याचा व त्यात आर्थिक हितसंबंध दडला असल्याचा आरोप आमदार भुसे यांनी याप्रसंगी केला. ग्रामीण भागात दिवसा वीज भारनियमन करण्यात येऊन रात्रीचा वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र रात्रीच्या वेळी शेतीकामे करण्यात मोठ्या अडचणी येतात. साप - विंचू यांची भीती असते. काही ठिंकाणी सर्पदंशाच्या तर काही ठिकाणी विहिरीत शेतकरी पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बाजरी, मका, कापूस, कांदा या पिकांचे नुकसान होत आहे. नाशिक विभागात सर्वात जास्त वसुली मालेगावची असून, देखील येथे वीजपुरवठ्याच्या समस्या कायम निर्माण होत असल्याचा आरोप आमदार भुसे यांनी केला. यासंदर्भात वीजकंपनीचे अधिकारी एस. एस. आडे यांना आमदार भुसे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी धारेवर धरले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात अधिकारी आडे यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी त्वरित २५ रोहित्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवळपास अडीच तास चाललेले सदर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मालेगाव पंचायत समितीचे सभापती धर्मराज पवार, प्रमोद शुक्ला, चंदनपुरीचे सरपंच राजेंद्र पाटील, विनोद वाघ, श्रीरामा मिस्तरी यांच्यासह शिवसैनिक व तालुक्यातील शेतकरी व ग्रामीण जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
आंदोलन : दादा भुसे यांचा वीज वितरणच्या कार्यालयात ठिय्या
By admin | Published: October 31, 2014 10:47 PM