नाशिक - महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिककर सरसावले असून वॉटस गु्रप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून वुई सपोर्ट मुंडे अशा हॅशटॅगवर नगरसेवकांनाच ट्रोल केले जात आहे. नगरसेवकांना भ्रष्टाचार थांबल्यानेच अस्वस्थ झालेल्या नगरसेवकांनी मुंढे हटाव मोहिम हाती घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे नागरी संघटना सक्रीय होत असतानाच मुंढे हटाव साठी सत्तारूढ भाजपाने शड्डू ठोकले असून मुंढे हटावच्या समर्थनार्थ व्यावसायिक संघटनांकडून समर्थनाची पत्रे घेण्यात आली आहेत.
नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भरमसाठ करवाढ केल्याचा ठपका ठेवून सत्तारूढ भाजपाने अन्य पक्षांच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. येत्या शनिवारी (दि.१ सप्टेंबर) विशेष महासभा महापौर रंजना भानसी यांनी बोलावली आहे. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी काही नागरीक पुढे आले असून त्यांनी वुई सपोर्ट तुकाराम मुंढे अशी मोहिम सुरू केली आहे. तुकाराम मुंढे भाजपाला का नको आहेत, पारदर्शक कारभाराला सर्व जण का घाबरतात अशा एकेक प्रश्न करीत सोशल मिडीयावर टीका सुरू आहे. सचिन मालेगावकर, जितेंद्र भाबे, जसबीर सिंंह, समाधान भारतीय यांनी लोकसंघटन सुरू केले असून सोशल मिडीयाबरोबरच प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, सत्तारूढ भाजपाने अविश्वास ठराव दाखल केल्याने त्यांनी देखील विविध व्यवसायिक संघटनांचे समर्थन मिळवणे सुरू केले आहे. त्यानुसार शिक्षण संस्था चालकांची संघटना, फेरीवाले व हॉकर्स संघटना तसेच म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेना आणि शेतकऱ्यांचे समर्थन मिळवण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात अनेक संस्थांनी मुंढे हटावसाठी समर्थन दिले आहे.
येत्या शनिवारी होणा-या विशेष महासभेपूर्वी अनेक घडोमोडींची शक्यता असून शिवसेना, महाराष्टÑ नवनिर्माण सेना या बरोबरच कॉंग्रेसचे नेता शाहु खैरे यांनीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दरवाढ रद्द केल्यास अविश्वास ठरावाला समर्थन देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.