लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी परिसरातील महिला शेतकऱ्यांनी तहसीलदार नरेश बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत येवला शहर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना देण्यात आली आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून अमानुष वागणूक दिली जात आहे. या शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी घटनास्थळी उपस्थित नव्हते, तर काहींनी फक्त बघ्याची भूमिका निभावली होती. तरीही त्यांना घरात घुसून अटक करण्यात आली आहे. दोषींवर कारवाई करा, मात्र निर्दोष शेतकऱ्यांची मुक्तता करा अन्यथा महिला शेतकरी मंगळवारपासून (दि. ६ जून) येवला तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर राधिका कळमकर, सविता क्षीरसागर, रेखा क्षीरसागर, जमुना क्षीरसागर, सोनाली क्षीरसागर, छाया क्षीरसागर, भारती धामणे, आशाबाई धामणे, इंदूबाई सोनवणे आदी महिला उपस्थित होत्या. प्रतिभा क्षीरसागर, सोनाली कळमकर, मोनिका चौधरी, शकुंतला वाडेकर, लताबाई गोसावी, देवाबाई गुंजाळ, अलका गुंजाळ, सुनिता गुंजाळ, सारिका धनवटे, लता गायकवाड जया गायकवाड, सुनिता भोरकडे आदीसह 50 महिलाच्या स्वाक्षर्या आहे. शेतकरी संपाच्या पिहल्याच दिवशी पिंपळगाव जलाल टोलनाक्यावरील झालेल्या आंदोलनात ४२ शेतकर्यावर धरपकड करत भादवी कलम ३९५ ,३०७, यासह १२ कलमे लाऊन गुन्हे दाखल केले आहे. सोमवारपर्यत ४२ शेतकर्यावर पोलीस कोठडी होती. त्यानंतर त्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुन्हे मागे घेण्यासाठी आंदोलन
By admin | Published: June 06, 2017 2:31 AM