नाशिक : शहरात अलीकडेच ४ आॅगस्ट रोजी आलेल्या महापुरानंतर महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने गोदापार्कच्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट गोदामध्ये मोठे बदल करण्याची तयारी केली असून, रामवाडी परिसरातील मनोरंजनाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे उंचवटे करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अर्थात, महापालिकेने २००९ मध्ये आखलेल्या पूररेषेच्या सर्व प्रकारच्या लेव्हल्स यापूर्वीच स्मार्ट सिटी कंपनीला दिल्या असताना आता २०१९ मध्ये म्हणजेच चालू महिन्याच्या पुराच्या आधारे प्रकल्पात बदल करून कोट्यवधी रुपयांचा खर्च वाढविण्याचा घाट घातल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने प्रोजेक्ट गोदा हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, सुमारे ७० कोटी रुपये खर्च होणार आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात विभागला गेला आहे. रामवाडी पूल ते होळकर पूल दरम्यान मनोरजंन क्षेत्र त्यानंतर पुढील टप्प्यात म्हणजेच होळकर ते गाडगे महाराज पुलाच्या दरम्यान आध्यात्मिक क्षेत्र तसेच त्यापुढील भागात टाळकुटे पुलापर्यंत वाहनतळ आणि अन्य मूलभूत सुविधा केंद्र अशाप्रकारची रचना प्रस्तावित आहे.यातील रामवाडी आणि गंगावाडी या दोन टोकांवर मनोरंजनात्मक क्षेत्र आहे. त्यातील रामवाडी भागात वॉक वे, योग साधनेसाठी जागा, कारंजा चित्रपट तसेच भिंतींवर पुराणातील माहितीचे रेखाटन अशा प्रकारच्या योजना आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या गेल्या बैठकीतच हे काम मंजूरदेखील करण्यात आले आहे. दरम्यान अलीकडचे म्हणजे ४ आॅगस्ट रोजी गोदावरी नदीला महापूर आला होता.करोडो रुपये खर्च करण्याचा घाटवरकरणी ही बाब योग्य वाटत असली तरी २००८ मध्ये नाशिकमध्ये पन्नास वर्षांतील सर्वाधिक मोठा पूर होता आणि त्यानंतर महापालिकेने २००९ मध्ये गोदावरीसह अन्य उपनद्यांनादेखील पूररेषा आखल्या आहेत. स्मार्ट सिटी कंपनीने प्रोजेक्ट गोदा हाती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना येथील तलांक आणि पूररेषेची महत्तम पातळी या सर्वच बाबतीत पूर्ण माहिती आणि दस्तावेज दिले आहेत. असे असताना आता निविदा मंजूर झाल्यानंतर त्यात बदल करून करोडो रुपयांचा खर्च करण्याचा घाट घातला जात असल्याचे वृत्त आहे.
प्रोजेक्ट गोदामध्ये सुधारणेच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:03 AM